महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ जुलै । Pune Water Supply News Today: भरपावसाळ्यात पाणीकपातीचा त्रास सहन करणाऱ्या पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुणे शहरातील पाणीकपात उद्यापासून रद्द होणार आहे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबतची घोषणा केली आहे.
त्यामुळे पुणेकरांना उद्यापासून पूर्णवेळ पाणी मिळणार आहे. पुण्याच्या पाणीप्रश्नाबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सिंचन विभाग आणि महापालिका अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुण्यात पावसाच्या जोरदार सरी बरसत असून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात मोठा पाणीसाठा जमा झाला आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणातील एकत्रित पाणीसाठा वाढला आहे.
पाणलोट क्षेत्रात अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत असल्याने धरणसाठ्यात वाढ झाली आहे. खडकवासला धरण भरल्याने त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता या प्रकल्पात एकूण २१.१८ टीएमसी (७२.६५ टक्के) इतका पाणीसाठा जमा झाला होता.
खडकवासला धरणसाखळीत गेल्यावर्षी इतका पाणीसाठा जमा झालेला आहे. तर टेमघर धरणात १.९६ (५२.८१) टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. याशिवाय वरसगाव धरणात ९.०२ (७०.३७ टक्के) टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. तर पानशेत धरणात ८.३० (७७.९५) टीएमसी, खडकवासला धरणात १.९० टीएमसी (९६.१७ टक्के) पाणीसाठा जमा झाला आहे.
विशेष बाब म्हणजे गेल्या २८ दिवसांत पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये १५ टीएमसी पाणीसाठ्याची भर पडली आहे. दरम्यान, पुण्याला वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा धरणांमध्ये जमा झाल्यानंतर पुण्यातील पाणीकपातीचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे आता पुणेकरांना पूर्णवेळ पाणी मिळणार आहे.