महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० जुलै । लोकसभा निवडणुकीसाठी एक वर्षाहून कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्यासाठी तयारीला लागले आहेत. तर, केंद्रातील भाजपाला सत्तेतून पायउतार करण्यासाठी विरोधक ‘इंडिया’ नावाच्या आघाडीअंतर्गत एकत्र आले आहेत. पण, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? याचा ओपिनियन पोल समोर आला आहे. ‘इंडिया टीव्ही’ आणि ‘सीएनएक्स’ने पोल हा केला आहे.
महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. त्यानुसार लोकसभा निवडणुकीत भाजपाला २० जागा मिळण्याची शक्यता पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे. भाजपानंतर सर्वाधिक ११ जागा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मिळू शकतील. काँग्रेसला ९, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ४, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला २ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला २ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे.
मतांच्या टक्केवारीचा विचार केल्यास भाजपाला ३२ टक्के, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला १६ टक्के, काँग्रेस १६ टक्के, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला १६ टक्के, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ७ टक्के, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ५ टक्के आणि अन्य पक्षांना ११ टक्के मते मिळू शकतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
या पोलनुसार भाजपाच्या ३ जागा कमी होणार आहेत. तर, एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या शिवसेनेला फक्त २ जागा मिळणार असून १० जागांचा फटका बसणार आहे. अजित पवारांना २ जागांचा फायदा, तर काँग्रेसच्या ८ जागा वाढणार आहेत. उद्धव ठाकरेंना ६ जागा जागांचा फायदा, तर शरद पवारांच्या ४ ही जागा तशाच राहणार आहेत.
विभागानिहाय कोणाला किती जागा मिळणार?
उत्तर महाराष्ट्र ६ जागा
एनडीए – ३
इंडिया – ३
विदर्भ १० जागा
एनडीए – ५
इंडिया – ५
मराठवाडा ८ जागा
एनडीए – २
इंडिया – ६
मुंबई ६ जागा
एनडीए – ४
इंडिया – २
ठाणे आणि कोकण ७ जागा
एनडीए – ५
इंडिया – २
पश्चिम महाराष्ट्र ११ जागा
एनडीए – ५
इंडिया – ६