नितीन देसाईंच्या मृतदेहाच्या शवविच्छेदना नंतर मृत्यूचे कारण आले समोर

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३ ऑगस्ट । प्रसिद्ध मराठमोळे कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी २ ऑगस्ट रोजी आत्महत्या केली. कर्जत येथील त्यांच्याच एन. डी. स्टुडिओमध्ये त्यांनी गळफास घेऊन जीवन संपवले. आपल्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट हिंदी, मराठी चित्रपटांमध्ये कला दिग्दर्शन करणाऱ्या देसाईंनी अचानक आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याने खळबळ उडाली आहे. आता त्यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे.

नितीन चंद्रकांत देसाई यांचे पोस्टमॉर्टम बुधवारी जेजे रुग्णालयात चार डॉक्टरांच्या टीमने केले. प्राथमिक निष्कर्षानुसार मृत्यूचे कारण फाशीमुळे झाल्याचे रायगड पोलिसांनी सांगितले. “चार डॉक्टरांच्या पथकाने कलादिग्दर्शक नितीन देसाई यांचे शवविच्छेदन केले. प्राथमिक निष्कर्षानुसार मृत्यूचे कारण फाशीमुळे झाले आहे. पुढील तपास सुरू आहे,” अशी माहिती रायगड पोलिसांनी दिली.

नितीन देसाई यांचा मृतदेह खालापूर पोलिसांनी शवविच्छेदनासाठी जेजे रुग्णालयात आणला होता. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, स्टुडिओतील एका कर्मचाऱ्याने सकाळी साडेनऊच्या सुमारास कर्जत पोलीस स्टेशनला फोन करून नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याची माहिती दिली. तर त्यानंतर पोलीस आणि त्यांच्या फॉरेन्सिक टीमने त्यांनी ज्या खोलीत गळफास घेतला त्या खोलीची पाहणी केली. त्या दरम्यान पोलिसांना नितीन देसाई यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली कोणतीही चिट्ठी सापडली नाही, पण त्यांना काही ऑडिओ रेकॉर्डिंग्स सापडली आहेत.

दरम्यान, आमदार महेश बालदी म्हणाले की नितीन देसाई आर्थिक विवंचनेत होते, त्यातूनच त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *