धावा करण्यासाठी या खेळाडूंवर ठेवू शकत नाही विश्वास ; सामना हरल्यानंतर हे काय बोलून गेला हार्दिक पांड्या?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ ऑगस्ट । वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-20मध्ये टीम इंडियाकडून पलटवार अपेक्षित होता. 5 सामन्यांची टी-20 मालिका बरोबरीत येईल अशी अपेक्षा होती. पण, कॅरेबियन खेळाडूंनी भारतीय संघाला आपली पातळी दाखवून दिली. दुसऱ्या T20 मध्ये वेस्ट इंडिजने भारतावर 2 विकेट्सने मात केली. या विजयानंतर वेस्ट इंडिजने 2-0 अशी आघाडी घेतली असली, तरी टीम इंडिया आता मालिका गमावण्याच्या मार्गावर आहे. अशा स्थितीत भारतीय कर्णधार हार्दिक पांड्याचे वक्तव्यही बरेच काही सांगून जाते. दुसऱ्या टी-20 नंतर हार्दिक पांड्याने जे सांगितले, त्यावरून हे स्पष्ट झाले आहे की तो धावा करण्यासाठी त्याच्या संघाच्या खालच्या क्रमावर अवलंबून राहू शकत नाही. संघातील अव्वल 7 फलंदाजांनाच हे काम करावे लागणार आहे.


वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय संघाला 150 धावांचा पाठलाग करता आला नाही. त्याचवेळी दुसऱ्या टी20 मध्ये 153 धावांचे लक्ष्य राखणे त्याच्यासाठी कठीण झाले. युवा संघाकडून चुका होतात, असे म्हणत हार्दिक पांड्याने पहिल्या टी-20 मधील पराभव पचवला. पण, दुसऱ्या टी-20मध्ये काय खरे होते, हे त्याच्याकडून उफाळून आले. त्याने संघाच्या पराभवाचे खापर भारतीय फलंदाजीवर फोडले.

आधी जाणून घ्या दुसऱ्या T20 मधील पराभवानंतर हार्दिक पांड्या काय म्हणाला. तो म्हणाला की, सत्य हे आहे की आम्ही चांगली फलंदाजी केली नाही. आम्ही यापेक्षा चांगले खेळू शकलो असतो. त्याने मान्य केले की खेळपट्टी थोडी संथ होती, परंतु इतकी नाही की त्यावर 160-170 धावा होऊ शकत नाहीत. मात्र भारतीय संघाला त्यात अपयश आले.

पांड्या पुढे अगदी स्पष्ट शब्दात म्हणाला की, फलंदाजांना त्यांची भूमिका समजून घ्यावी लागेल. त्यांना जबाबदारी घ्यावी लागेल. त्याला संघाच्या खालच्या क्रमाने धावा करण्याबाबत विचारले असता तो म्हणाला की, सध्याच्या संघात अव्वल 7 फलंदाज वगळता बाकीच्यांवर धावा करण्यासाठी आपण अवलंबून राहू शकत नाही.

दुसऱ्या टी20 मध्ये भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 विकेट गमावत 152 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना वेस्ट इंडिजने 19 व्या षटकातच 8 गडी गमावत 155 धावा करून लक्ष्य गाठले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *