म्हाडाची ऑक्टोबर महिन्यात ४ हजार ५०० घरांची लॉटरी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ ऑगस्ट । मुंबई मंडळाच्या ४ हजार घरांच्या लॉटरीनंतर आता म्हाडाच्या कोकण मंडळाकडून ऑक्टोबर महिन्यात सुमारे ४ हजार ५०० घरांची लॉटरी काढली जाईल, अशी घोषणा म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी सोमवारी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या मुंबई मंडळाच्या लॉटरीच्या कार्यक्रमात केली. ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांत ही घरे असतील.

गिरणी कामगारांना बीडीडी चाळीत घर मिळावे म्हणून काम सुरू असल्याचेही जयस्वाल यांनी यावेळी सांगितले. लॉटरीमध्ये लागलेल्या घराची किंमत दोन टप्प्यांत भरता येईल. २५ टक्के रक्कम प्रथमतः आणि नंतर ७५ टक्के रक्कम भरता येईल. सहा महिन्यांत विजेत्यांना घर ताब्यात मिळेल.

म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबईतील विविध गृहनिर्माण योजनांतर्गत अंधेरी, जुहू, गोरेगाव, कांदिवली, बोरीवली, विक्रोळी, घाटकोपर, पवई, ताडदेव, सायन येथे उभारण्यात आलेल्या ४ हजार ८२ सदनिकांच्या विक्रीसाठी प्राप्त १ लाख २० हजार २४४ पात्र अर्जांची संगणकीय सोडत सोमवारी नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये काढण्यात आली.

म्हाडाने लोकांचे गृहस्वप्न पूर्ण केले असले, तरीही त्यांनी अधिक वेगाने काम करावे; जेणेकरून एका घरामागे ३० अर्ज हे गुणोत्तर कमी होऊन एका घरामागे ५ अर्ज एवढे कमी करावे. तरच प्रत्येकाला घर देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होऊ शकेल. गरजवंताला घरे देण्यासोबतच शासनाने रखडलेले पुनर्विकास प्रकल्प आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प यांनाही गती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या माध्यमातून मुंबईबाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा या शहरात आणण्याचा प्रयत्न केला जाईल. – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री.

प्रीमियम पेक्षा हाऊसिंग स्टॉक घ्या, असे मी म्हाडाला सांगितले आहे. त्यामुळे गरिबांना घरे मिळण्यास मदत होणार आहे. आमचा भर हा हाऊसिंग स्टॉकवर आहे. ६०० इमारतींना नोटीस दिली आहे. म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मुंबईवरचा ताण आपण कमी करत आहोत. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक मुंबईला जोडणार आहे. नवी मुंबईतदेखील घरे उभी केली जात आहेत. घरांच्या किमती वाढणार नाहीत याकडे लक्ष देत आहोत. माफक किमतीत घरे देण्यासाठी काम करणार आहोत. – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *