![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ मे । राज्य सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकर्यांत स्वतंत्रपणे १० टक्क आरक्षण दिले असले तरी सगेसोयरे अधिसूचना अद्याप अंतिम झालेली नाही. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एल्गार केला आहे. ४ जून पासून पुन्हा एकदा उपोषण करणार असल्याचे जरांगे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी बोलताना सांगितले. ८ जूनला नारायणगडावर मराठा समाजाची विराट सभा होणार असल्याचेही जरांगे पाटील यांनी सांगितले.
मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण मिळावे, अशी मागणी करतानाच ज्यांचे कुणबी असल्याचे पुरावे सापडतील, त्यांच्या सगेसोयर्यांनाही कुणबी दाखले देण्याची मागणी केली होती. ही मागणी घेऊन लाखोंच्या संख्येने मराठा समाज मुंबईच्या वेशीवर धडकल्यानंतर वाशी येथे २६ जानेवारीला या आंदोलनावर तोडगा काढण्यात आला. राज्य सरकारने जरांगे यांची दुसरी मागणी मान्य करत ज्यांच्या कुणबी नोंदी सापडतील त्यांच्या सगेसोयर्यांनाही कुणबी दाखले देण्याविषयी काढण्यात येणार्या अधिसूचनेचा मसुदा सोपविण्यात आला. ही मागणी मान्य झाल्यावर जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उपोषण संपल्याची घोषणा केली होती. मात्र, त्यानंतर ही अधिसूचना अंतिम झाली नसल्याने जरांगे यांनी राज्य सरकारवर विश्वासघात केल्याचा आरोप केला होता.
