महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ मे । कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आपल्या लाखो सब्सक्राइबर्सना मोठा दिलासा दिला आहे. १९५२ मध्ये ईपीएफओची स्थापना करण्यात आली होती, ज्याद्वारे सुरुवातीला सरकारी कर्मचाऱ्यांना लाभ देण्यात येत होता पण नंतर खासगी कर्मचाऱ्यांना जोडून योजनेचा विस्तार करण्यात आला. EPF योजनेत कर्मचारी आणि कंपन्यांकडून दर महिन्याला पीएफ फंडात ठराविक योगदान दिले जाते ज्यावर वार्षिक आधारावर सरकारकडून व्याज दिला जातो. सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्याला मोठा निधी आणि मासिक पेन्शनचा लाभ मिळतो.
EPFO कर्मचाऱ्यांना मोठी भेट
आता ईपीएफओने आपल्या खातेधारकांना सुविधा देण्यासाठी ऑटो क्लेम सेटलमेंटची व्याप्ती वाढवली आहे. म्हणजे आता घरबांधणी, लग्न किंवा अभ्यासाचे दावे लवकर निकाली काढला जातील तर ईपीएफओने ऑटो क्लेम सेटलमेंटची मर्यादा ५०,००० रुपयांवरून एक लाख रुपये केल्याची वृत्तसंस्था IANS च्या हवाल्याने माहिती कामगार मंत्रालयाने दिली आहे.
ईपीएफओने वरील कारणांसाठी ऑटो क्लेम सोल्यूशन सुरू केले असून यामध्ये IT (तंत्रज्ञान) प्रणालीद्वारे दावे निकाली काढले जातील. ईपीएफओने सांगितले की, गेल्या आर्थिक वर्षात त्यांनी ४.५ कोटी दावे निकाली काढले आहेत. यापैकी ६०% हून अधिक दावे आगाऊ दाव्यांसाठी होते. रोगावरील उपचारांसाठी ॲडव्हान्स क्लेम सेटलमेंटसाठी ऑटो मोड सुविधा एप्रिल २०२० पासूनच सुरू करण्यात आली होती.
कोणत्या परिस्थितीत EPF दावे लवकर निकाली लागतील
गेल्या आर्थिक वर्षात अंदाजे ८९.५२ लाख दावे स्वयं-मोड अंतर्गत निकाली काढण्यात आले होते. ईपीएफ योजना १९५२ च्या पॅरा 68K (शिक्षण आणि लग्नासाठी) आणि 68B (गृहनिर्माण) साठी ऑटो क्लेम सुविधा देखील सुरू करण्यात आली.
यापूर्वी दावे निकाली काढण्यासाठी अधिक वेळ लागायचा पण आता तसं होणार नाही. ऑटो सेटलमेंट प्रणालीअंतर्गत कोणताही मानवी हस्तक्षेप होणार नाही, ज्यामुळे दावा लवकर निकाली काढला जाईल. ऑटो क्लेम सेटल आयटी प्रणालीद्वारे चालवले जाईल. अगदी KYC, पात्रता आणि बँक प्रमाणीकरण आयटी टूल्सद्वारे आपोआप प्रक्रिया केली जाईल.आधी दावा सेटल करण्यासाठी किमान दहा दिवस लागायचे पण आता तीन ते चार दिवसात दावे निकाली लागतील.
दावा अजूनही नाकारला की परत केला जाईल का?
मंत्रालयाने म्हटले आहे की जर कोणत्याही दाव्याचे निराकरण आयटी प्रणालीद्वारे केले गेले नाही तर ते नाकारले किंवा परत केले जाणार नाही. याउलट IT प्रणालीद्वारे दावा निकाली काढला नाही तर दुसऱ्या स्तरावरील छाननी आणि मंजुरीद्वारे निकाली काढला जाईल. अशा स्थितीत, ईपीएफओच्या ऑटो क्लेम केल्यानंतर आता घर, लग्न किंवा शिक्षणासाठी केलेले दावे कमी वेळेत निकाली काढले जातील जेणेकरून ईपीएफओ सदस्यांना लवकरात लवकर निधी मिळू शकेल.