महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि.१८ मे ।। पुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या (मॉन्सून) प्रगतीसाठी सध्या हवामानातील आवश्यक घटक पूरक आहेत. त्यामुळे यंदाच्या मॉन्सूनची प्रगती वेगाने सुरू असून, तळकोकणात तो सहा जूनला हजेरी लावेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
मॉन्सून रविवारी (ता. १९) दक्षिण अंदमानच्या समुद्रात दाखल होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने यापूर्वी वर्तविली आहे. मॉन्सूनचे देशातील महाद्वार असलेल्या केरळमध्ये ३१ मे रोजी दाखल होणार असल्याचेही विभागाने जाहीर केले आहे. त्यामुळे आता राज्यात मॉन्सून कधी बरसेल, याची उत्सुकता वाढली आहे, या पार्श्वभूमीवर विभागातील अधिकाऱ्यांनी माहिती दिली.
अंदमान आणि केरळमध्ये मॉन्सून कधी पोहोचेल, याचा अंदाज हवामान विभागातर्फे दिला जातो. मात्र तो राज्यात कधी पोहोचेल याचा अंदाज विभाग जाहीर करत नाही. मॉन्सूनची उत्तरेकडे होणाऱ्या प्रगतीच्या सरासरी तारखा ठरल्या आहेत.ले.
त्यानुसार गोव्यात पाच जूनला दाखल होऊन उत्तरेकडे वाटचाल करत सहा जूनला तळकोकणात राज्यातील पहिली सलामी देतो. त्यानंतर पुण्यापर्यंतचा प्रवास सात जूनपर्यंत पूर्ण करतो. यंदा मॉन्सून दाखल होत असताना कोणतेही चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात निर्माण झालेले नाही. त्यामुळे मॉन्सूनच्या प्रवासाची सुरुवात कोणत्याही अडथळ्याशिवाय झाली आहे. त्यातून मॉन्सूनचा सरासरीप्रमाणे प्रवास होईल, अशी अपेक्षाही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
सांख्यिकी प्रारूपाचा वापर
भारतीय हवामान विभाग २००५ पासून मॉन्सून केरळमध्ये दाखल होण्याची तारीख जाहीर करत आहे. त्यासाठी सांख्यिकी पद्धतीचे प्रारूप विकसित करण्यात आले आहे. त्या आधारावर चार दिवस पुढे-मागे मॉन्सून केरळमध्ये दाखल होईल, असे सांगण्यात आले.