महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि.१८ मे ।। ‘आरटीई’ राखीव जागांच्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेसाठी पहिल्याच दिवशी २२ हजार ६७६ अर्ज आले. पुण्यातून सर्वाधिक म्हणजे चार हजार ८७९ अर्ज प्राप्त झाले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शिक्षण विभागाने सुधारित प्रवेशप्रक्रिया शुक्रवारपासून सुरू केली. अर्ज भरण्याचा पहिलाच दिवस असला तरी पालकांनी मोठ्या संख्येने अर्ज भरले. अर्ज भरण्यासाठी ३१ मेपर्यंत मुदत आहे.
शिक्षण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध आहेत. प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची माहितीही देण्यात आली आहे. इंग्रजी माध्यमाच्या राज्यातील नऊ हजार १३९ शाळांमधील एक लाख दोन हजार ४३६ जागांवर प्रवेशप्रक्रिया राबवली जात आहे. पालकांचा कल इंग्रजी शाळांकडे असल्याने सुमारे तीन ते चार लाख पालक अर्ज करण्याची शक्यता आहे.