IPL 2024 : ‘प्लेऑफ’मधील स्थान निश्चितीसाठी आज चेन्नई- बंगळूरु निर्णायक लढत ; धोनीचा शेवटचा सामना ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।। दि.१८ मे ।। सलग पाच सामने जिंकून ‘प्ले-ऑफ’मध्ये प्रवेशाच्या आशा कायम राखणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघाचा आज, शनिवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध कस लागणार आहे. या सामन्यातील विजेता संघ ‘प्ले-ऑफ’मधील स्थान निश्चित करेल. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा ‘करो या मरो’चा सामना असणार आहे. शिवाय महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली या तारांकितांमधील हे अखेरचे द्वंद्व असू शकेल.

चेन्नईचा माजी कर्णधार धोनीचा हा अखेरचा हंगाम ठरण्याची दाट शक्यता आहे. त्यात बंगळूरु आणि चेन्नई यांच्यापैकी केवळ एकच संघ ‘प्ले-ऑफ’मध्ये प्रवेश करू शकणार आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी आपल्या लाडक्या धोनी आणि कोहलीला एकाच मैदानावर पाहण्याची ही अखेरची संधी ठरू शकेल.

आणखी वाचा
हा सामना ‘प्ले-ऑफ’मधील संघ निश्चित होण्याच्या दृष्टीने निर्णायक ठरणार आहे. गुरुवारी गुजरात टायटन्सविरुद्ध सामना पावसामुळे रद्द झाल्याने सनरायजर्स हैदराबाद संघाचे ‘प्ले-ऑफ’मधील स्थान निश्चित झाले. कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांनीही यापूर्वीच ‘प्ले-ऑफ’मध्ये प्रवेश मिळवला आहे. त्यामुळे आता केवळ एका संघाची जागा रिक्त असून चेन्नई आणि बंगळूरु यांच्यातील विजेता संघ स्पर्धेत आगेकूच करणार आहे.

हा सामना बंगळूरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगणार असून या मैदानावर गेल्या आठपैकी केवळ एका सामन्यात चेन्नईला पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे बंगळूरुचा संघ लयीत असला आणि घरच्या मैदानावर खेळणार असला, तरी चेन्नईच्या संघाला नमवणे त्यांना सोपे जाणार नाही.

पावसाचे सावट…समीकरण काय?
गुणतालिकेत चौथ्या स्थानासाठी सध्या चेन्नई आणि बंगळूरु या संघांमध्ये चुरस आहे. चेन्नईच्या खात्यावर १३ सामन्यांत १४ गुण, तर बंगळूरुच्या खात्यावर १३ सामन्यांत १२ गुण आहेत. त्यातच चेन्नईची (०.५२८) निव्वळ धावगती बंगळूरुच्या (०.३८७) तुलनेत सरस आहे. त्यामुळे बंगळूरुच्या संघाला प्रथम फलंदाजी केल्यास १८ धावांनी किंवा धावांचा पाठलाग केल्यास ११ चेंडू राखून हा सामना जिंकावा लागेल. बंगळूरु येथे होणाऱ्या या सामन्यावर पावसाचे सावटही आहे. पावसामुळे सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना एकेक गुण मिळेल आणि चेन्नईचा संघ स्पर्धेत आगेकूच करेल. या सगळ्या परिस्थितीकडे पाहता ‘प्ले-ऑफ’ प्रवेशासाठी सध्या चेन्नईचे पारडे जड दिसत आहे.

फलंदाजांवर मदार
बंगळूरु येथील खेळपट्टी फलंदाजीला अनुकूल मानली जाते. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यांत मोठ्या धावसंख्या पाहायला मिळाल्या आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यातही दोन्ही संघांची फलंदाजांवर मदार असेल. एकीकडे बंगळूरुच्या विराट कोहली, फॅफ ड्यूप्लेसिस आणि रजत पाटीदार, तर दुसरीकडे चेन्नईच्या ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे आणि धोनी यांसारख्या फलंदाजांच्या कामगिरीकडे चाहत्यांचे लक्ष असेल. धोनीचा हा अखेरचा ‘आयपीएल’ सामनाही ठरू शकेल. त्यामुळे आपली सर्वोत्तम कामगिरी करण्याचा त्याचा प्रयत्न असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *