महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – मुंबई – कोरोना संकटात डॉक्टर, पोलीस असे सर्वजण एकत्रितरित्या काम करत आहेत. कोरोनाशी झुंज देताना अनेक पोलिसांनी आपले प्राणही गमावले. राज्य सरकार त्यांना मदत देण्याचा प्रयत्न करत आहेच पण ज्या पोलिसांनी उत्कृष्ट काम केले त्यांना ‘शौर्य पुरस्कार’ देऊन गौरवण्यात येईल अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली.
कोरोनामुळे जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या काळात पोलीस यंत्रणेने महत्वाची भूमिका बजावली होती. नागरिकांना रस्त्यावर येऊ न देणे, गर्दी करू न देणे याची काळजी पोलिसांनी घेतली. कंटेनमेंट झोनमध्ये संसर्ग वाढू नये म्हणून ते सतत गस्त घालत होते. त्यांच्या दक्षतेमुळेच कोरोनाचा संसर्ग मोठय़ा प्रमाणात टाळता आला.
कर्तव्य बजावत असताना अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनाही कोरोनाची लागण झाली. त्यानंतरही हजारो पोलीस आपले कर्तव्य चोख बजावत आहेत. कोरोनाशी त्यांची झुंज सुरू आहे. त्यांच्या कार्याचा गौरव या पुरस्काराच्या माध्यमातून केला जाणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. गृहमंत्री अनिल देशमुख हे आज बार्शी आणि सोलापूर दौऱयावर आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.