महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १९ जुन ।। राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढल्याचं दिसून येत आहे. अनेक भागात आज पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत आज सकाळपासून पावसाचं वातावरण दिसून येत आहे. येत्या काही तासांमध्ये मुंबई आणि उपनगर परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यभरात पावसाने दडी मारल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे.
नैऋत्य मोसमी वाऱ्यांची (मॉन्सून) वाटचाल अडखळली असली तरी राज्यात तुरळक ठिकाणी हलका ते जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे पुणे, सातारा, रत्नागिरी, रायगड सिंधुदुर्गसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत बुधवारी (ता. १९) जोरदार पावसाचा ‘यलो अलर्ट’ हवामान खात्याने दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी गेल्या चोवीस तासांमध्ये हलक्या ते जोरदार सरी कोसळल्या. नाशिकमधील हसूल येथे ७७ आणि रत्नागिरीतील खेड येथे ७१ मिलिमीटर पावसाची नोंद होत अतिवृष्टी झाली, विदर्भात अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. मॉन्सून दाखल झालेल्या भागातही पावसाने अपेक्षित जोर धरलेला नाही.
उन्हाचा चटका वाढला
पावसाची उघडीप असलेल्या भागात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका आणि उकाडा कायम आहे. पावसाअभावी विदर्भात कमाल तापमान चाळीशीपार गेला. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान विदर्भातील ब्रह्मपुरी येथे ४१.३ अंश तापमानाची नोंदले गेले. चंद्रपूर
येथे पारा ४० अंशांपार गेला. कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर बुधवारी (ता. १८) जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार वारे, विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
कोणत्या भागात पावसाची शक्यता?
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यातील जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, लातूर, नांदेड, धाराशिव जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नाशिक, सोलापूर जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. मुंबई, पुणे, रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी पेरणी करण्यापूर्वी कृषीविभागाच्या अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा, असं आवाहनही करण्यात आलं आहे.
या जिल्ह्यात यलो अलर्ट
ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा
वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा (यलो अलर्ट)
बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली