Update: मान्सूनने महाराष्ट्र व्यापला; पुढील ५ दिवस महत्त्वाचे, ‘या’ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २४ जुन ।। मान्सूनने रविवारी उर्वरित महाराष्ट्र व्यापला असून, आता संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्याचे जाहीर करण्यात आले. आज, सोमवारपासून सुरू होणाऱ्या आठवड्यामध्ये कोकण-गोवा येथे बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी, तर विदर्भात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आठवड्यात सर्वदूर
जूनचा अखेरचा आठवडा आला, तरी पावसाने अपेक्षित वेग गाठलेला नाही. त्यामुळे मान्सून दाखल होऊनही पाऊस अनुभवण्यासाठी राज्यातील नागरिक प्रतीक्षा करीत आहेत. येत्या आठवड्यात मात्र महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात पावसाळी वातावरण निर्माण होईल.

कोकण, विदर्भात तूट
एक जून ते २३ जून या कालावधीत कोकण आणि गोव्यात पावसाची नऊ टक्के तूट आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अल्पावधीत अधिक पावसाने अनुक्रमे नऊ टक्के आणि ४० टक्के अतिरिक्त पाऊस नोंदला गेला आहे. विदर्भात १६ टक्के तूट आहे. येत्या आठवड्यातील पावसाच्या व्यापकतेमुळे कोकण आणि विदर्भातील तूट कमी होण्याची शक्यता आहे. मुंबई शहरामध्ये सरासरीपेक्षा ४३, तर उपनगरांमध्ये ४६ टक्के पावसाची तूट आहे.

पावसाचा अंदाज
प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवलेल्या पूर्वानुमानानुसार रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, साताऱ्याचा घाट परिसर या भागात या आठवड्यात ‘ऑरेंज अॅलर्ट’ देण्यात आला आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने या काळात वर्तवली आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्येही मंगळवारपासून तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यात सोमवारी तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो.
सरकार काठावर पास, मेरीटवर नाही; १० दिवसांनंतर लक्ष्मण हाकेंचं उपोषण स्थगित, पण इशारा कायम

मुंबईत उकाडा वाढला
मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मुंबईत रविवारसाठीही ‘यलो अॅलर्ट’ देण्यात आला होता; मात्र या काळात दोन्ही केंद्रांवर फार पाऊस नोंदला गेला नाही. रविवारी दिवसभरात कुलाबा येथे पाच, तर सांताक्रूझ येथे चार मिलीमीटर पाऊस पडला. पावसाचे प्रमाण अजूनही मुंबईत कमी असल्याने तापमानाचा पारा चढा आहे. कुलाबा येथे ३१.९ तर सांताक्रूझ येथे ३३.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मुंबईत दिवसभरात तुरळक केंद्रांवर ५ ते १० मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. बहुतांश केंद्रांवर शिडकाव्याची नोंद झाली. ढगाळलेले आभाळ असतानाही फारसा पाऊस पडत नसल्याने आर्द्रतेमुळे उकाडा वाढला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *