महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ जुलै ।। Pune News- पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे पुण्यातील चारही धरणांमध्ये 80 टक्के पेक्षा अधिक पाणी साठा जमा झाला आहे. पुण्यातील चार ही धरणे मिळून 86.51 टक्के इतका पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे पुणेकरांसाठी ही समाधानाची आणि आनंदाची बाब आहे.
गेल्या वर्षी याच काळात 74.17 टक्के इतका पाणीसाठा होता. त्यामुळे यावेळी चांगल्या पावसाचा परिणाम धरणक्षेत्रातील साठ्यावर झाला आहे. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 25.22 टीएमसी पाणी जमा झाले आहे. पुण्याला चार प्रमुख धरणांमधून पाठीपुरवठा केला जातो. यात खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांचा समावेश होतो. कोणत्या धरणात किती पाणीसाठा आहे हे जाणून घ्या
पुण्यातील धरणातील पाणीसाठा
खडकवासला: 86.24 टक्के
पानशेत: 94.99 टक्के
वरसगाव: 81.46 टक्के
टेमघर: 80.03 टक्के
मिळालेल्या माहितीनुसार, खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग आता 22880 क्यूसेक्सने करण्यात येणार आहे. नदी पात्रातील निषिद्ध क्षेत्रात उतरू नये अशा सूचना पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना दिल्या आहेत. सखल भागातील नागरिकांनी नदी पात्रात जाऊ नये, असंही प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
मुठा नदी मध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. खडकवासला धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे विसर्ग सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळला होता. त्यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरलं होतं. पुणेकरांना काही दिवस मनस्तापाला सामोरे जावे लागले होते.