महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ९ ऑक्टोबर ।। देशातले ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती येत आहे. मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सोमवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं. परंतु तेव्हा प्रकृती स्थिर असल्याचं त्यांनीच सोशल मीडियाद्वारे सांगितलं होतं. आता पुन्हा त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती येत आहे. ‘साम टीव्ही’ने हे वृत्त दिले आहे.
रतन नवल टाटा हे भारतीय उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष आहेत. 1990 ते 2012 या काळात ते टाटा समूहाचे अध्यक्ष म्हणून टाटा समूहाचे प्रमुख होते. ते ऑक्टोबर 2016 ते फेब्रुवारी 2017 पर्यंत अंतरिम अध्यक्षही होते. रतन टाटा हे सध्या चॅरिटेबल ट्रस्टचे नेतृत्व करत आहेत. रतन नवल टाटा यांना पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान मिळाले आहेत.
रतन टाटा यांना सोमवारी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर माध्यमांमध्ये बातम्या प्रकाशित झाल्या होत्या. त्यानंतर रतन टाटा यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तब्येतीची माहिती देण्यात आलेली होती. त्यात त्यांनी, ”माझ्या आरोग्याबाबत पसरत असलेल्या अफवांची मला जाणीव आहे आणि हे दावे निराधार आहेत याची मी सर्वांना खात्री देतो. माझे वय आणि संबंधित वैद्यकीय परिस्थितीमुळे मी सध्या वैद्यकीय तपासणी करत आहे. त्यामुळे चिंतेचे कारण नाही. मी विनंती करतो की सार्वजनिक आणि माध्यमांनी चुकीची माहिती पसरवण्यापासून दूर राहावे.’ अशी माहिती दिली होती. आता बुधवारी त्यांची पुन्हा त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती येत आहे.