Maharashtra Weather Update: वर्षाचा शेवट होणार पावसाने! राज्यात गुलाबी थंडीची चादर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२० डिसेंबर ।। राज्यामध्ये थंडी चांगलीच वाढली आहे. उत्तरेकडील राज्यातील येणाऱ्या थंड आणि कोरड्या वाऱ्यामुळे राज्यातील थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. राज्यात थंडीची लाट पसरली असून संपूर्ण महाराष्ट्र गारठला आहे.

सध्या मुंबईकर देखील गुलाबी थंडीचा अनुभव घेत आहेत. राज्यातील तापमानाचा पारा १० च्या खाली गेला आहे. धुळ्यामध्ये सर्वात नीचांकी ४.२ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत राज्यातील किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, डिसेंबर २०२४ च्या शेवटच्या आठवड्यात उत्तर मध्य महाराष्ट्र आणि आसपासच्या भागात हलक्या पावसाची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्रात सर्वात जास्त थंडी पडल्याचे चित्र आहे. गुरुवारी धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील सर्वात कमी म्हणजे 4.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

तसेच परभणीत 5.5, निफाडमध्ये 6.4, जेऊर 7.1, अहिल्यानगर 7.5 आणि नांदेडमध्ये 7.6 अंश सेल्सिअत तापमानाची नोंद झाली आहे. आगामी काही काळात राज्यातील तापमानात किंचित बदल होणार आहे मात्र थंडी कायम राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

उत्तर भारतात थंडीची लाट कायम आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून धुळे, परभणी, निफाड, जेऊर, अहिल्यानगर, नांदेड, नाशिक, पुणे, बीड, छत्रपती संभाजीनगर, परभणी, नागपूर, गोंदिया, भंडारा, वर्धा येथे किमान तापमान 10 अंशांपेक्षा कमी नोंदवण्यात आले आहे. त्यामुळे या भागातील नागरिक गुलीबी थंडीचा अनुभव घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *