महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२० डिसेंबर ।। दोन्ही ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ पक्षांचे मनोमीलन होण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकामागून एक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला जाताना दिसत आहेत. शशिकांत शिंदे यांनी नागपुरातील उपमुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान ‘विजयगड’ येथे जाऊन दादांची भेट घेतल्याचा प्रकार ताजा असतानाच, अवघ्या दोनच दिवसात शरद पवार गटाचे आणखी दोन नेते अजित पवार यांच्या भेटीला गेले आहेत.
दिवंगत नेते आर आर आबा यांचे सुपुत्र आणि पवार गटाचे युवा आमदार रोहित आरआर पाटील, तसेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख यांनी अजित पवार यांची भेट घेतली. योगायोगाने रोहित आणि सलील हे दोघेही माजी गृहमंत्र्यांचे लेक आहेत.
नागपुरात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने अजित पवार शहरात आहेत. शुक्रवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारासच या भेटीगाठी घडल्या. रोहित पाटील आणि सलील देशमुख वेगवेगळे गेले असले, तरी ही भेट एकत्रित झाली का, हे समजू शकलेले नाही. मात्र पवार गटाचे नेते एकामागून एक अजित पवारांची भेट घेत असल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.
रोहित पाटलांसोबत वाद मिटले?
यापैकी रोहित पाटील हे सांगली जिल्ह्यातील तासगाव-कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार संजयकाका पाटील यांना पराभवाची धूळ चारुन विजयी झाले. अधिवेशनाच्या निमित्ताने ते नागपुरात आहेत. आबा आणि दादा यांच्यातील मैत्र सर्वश्रुत आहेत. एकसंघ राष्ट्रवादीत असताना रोहित पाटलांची अजितदादांसोबत असलेली जवळीक फुटीनंतर कमी झाली होती. त्यातच, नजीकच्या काळात अजित पवारांनी फाईलीबाबत आबांवर केलेल्या आरोपांनंतर दोन कुटुंबांत कटुता वाढल्याचं चित्र होतं. मात्र आता सारे दुरावे विरल्याचे दिसते.
सलील देशमुख का भेटीला?
दुसरीकडे, सलील देशमुख यांना शरद पवारांनी नागपूर जिल्ह्यातील काटोल विधानसभा मतदारसंघातून अनिल देशमुख यांच्या जागी उमेदवारी दिली होती. मात्र सलील यांना वडिलांचा गड राखता आला नाही. निवडणुकीच्या तोंडावर अनिल देशमुखांवर झालेल्या हल्ल्याने वातावरण तापलेही होते. परंतु काटोलवर भाजपच्या चरणसिंग ठाकूर यांनी झेंडा फडकवला. सलील देशमुख पराभूत झाले असले, तरी अजितदादा नागपुरात आल्याने मतदारसंघातील कामांचे कारण सांगत त्यांनी भेट घेतली. या भेटींचे नेमके कारण अजून गुलदस्त्यातच आहे.