महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२० डिसेंबर ।। काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रतोद रोहित पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. त्यांच्या भेटीमुळे आता अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांनाही उधाण आलं आहे.
रोहित पाटील आज सकाळी अजित पवार यांच्या नागपूरमधील विजयगड या बंगल्यावर दाखल झाले. यावेळी त्यांनी अजित पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवादही साधला. या भेटीनंतर बोलताना त्यांनी अजित पवारांबरोबरच्या भेटींचं कारण ही सांगितलं.
”मतदारसंघातील कामांच्यासंदर्भात मी काल अजित पवार यांना भेटण्याचा प्रयत्न केला होता. पण ते शक्य झालं नाही. त्यामुळे आज त्यांच्या निवासस्थानी जाऊन मी त्यांना कामासंदर्भातील पत्र दिलं आहे. माझ्या मतदारसंघातील काही भागात विजेच्या डीपी बसवण्याचं काम बाकी आहे. त्यासंदर्भात निधी मिळावा अशी मागणी आम्ही अजित पवार यांच्याकडे केली आहे. त्यासंदर्भात मी त्यांची भेट घेतली”, अशी प्रतिक्रिया रोहित पाटील यांनी दिली.
रोहित पाटील यांच्याव्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सुपूत्र सलील देशमुख यांनीही अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीसंदर्भात बोलताना, अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत आणि मी काही कामांच्यासाठी आलो आहे. मी मविआचा उमेदवार होतो. जनतेने दिलेला कौल मी मान्य केला आहे. चर्चा होत असते, असं सलील देशमुख म्हणाले.
दरम्यान, अजित पवारांच्या नागपूर येथील विजयगड निवासस्थानी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. गुलाबी जॅकेट घालून काही कार्यकर्ते अजित पवार यांना भेटण्यासाठी आले आहेत. तर नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदेंनी देखील अजित पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर सुहास कांदे यांनी छगन भुजबळांवर निशाणा साधला. ‘भुजबळांचं काही वाईट होतं तेव्हा मला आनंदच होतो. भुजबळांमध्ये एवढी हिंमत नाही की ते पक्ष सोडतील. मी अजित पवारांची भेट घेऊन त्यांचं अभिनंदन केलं.’, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
