एसटीच्या एक हजार अधिकाऱ्यांची बदली? परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचा महामंडळाला आदेश

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। मंगळवार दि. २५ मार्च ।। राज्य परिवहन (एसटी) महामंडळात वर्षानुवर्षे एकाच पदावर ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांवर आता कारवाई होण्याची शक्यता आहे. एसटी महामंडळात एकाच मुख्यालयात तीन वर्षांपेक्षा जास्त काळ कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या तातडीने बदल्या करण्याचे आदेश परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाला सोमवारी दिले. यामुळे राज्यातील सुमारे एक हजार अधिकाऱ्यांवर बदलीची टांगती तलवार आहे.

एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांच्या संदर्भात आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली विविध कामगार संघटनेने सरनाईक यांची भेट घेतली. यावेळी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनवार उपस्थित होते.

अधिकारी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी असल्यामुळे काही ठरावीक कर्मचाऱ्यांशी हितसंबंध निर्माण होतात. त्यातून आर्थिक गैरव्यवहार होण्याची शक्यता बळावते. अनेकदा याचा उपयोग महामंडळाच्या कामांव्यतिरिक्त अन्य कामांसाठीदेखील होतो. त्यामुळे सामान्य कर्मचाऱ्यांवर अन्याय होतो. याचा एकत्रित परिणाम एसटीसेवेवर होतो. एकाच मुख्यालयात तीन वर्षांपेक्षा जास्त वेळ कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची तातडीने बदली करावी, असे निवेदन आमदार पडळकर यांनी दिले. अधिवेशन संपल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून बदल्यांबाबत योग्य निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन सरनाईक यांनी दिले.

घोटाळ्याची किनारएसटीमध्ये नुकताच जाहिरात घोटाळा उघडकीस आला होता. १,३१० बस खरेदीच्या निविदेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. या प्रकरणातील निर्णय प्रक्रियेत वरिष्ठ एसटी अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप दिसून येत असल्याचा आरोप आहे. एकाच ठिकाणी राहिल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांची मक्तेदारी तयार झालेली आहे. ती मोडून काढण्यासाठी बदलीची कारवाई होत असून याला गैरव्यवहाराची किनार आहे, अशी चर्चा एसटी मुख्यालयात सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *