महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० मे ।। पहलगाम हल्ल्याचा बदला घेत भारताने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे ९ तळ नष्ट केले. ऑपरेशन सिंदूरअंतर्गत भारताने ही मोठी कारवाई केली होती. पण ऑपरेशन सिंदूरमुळे संतप्त झालेला पाकिस्तान गेल्या ३ दिवसांपासून भारतावर सत्त ड्रोन आणि क्षेपणास्त्राद्वारे हल्ला करत आहे. पारिस्तानकडून वारंवार होणाऱ्या या युद्धबंदीच्या उल्लंघनाला भारताकडून देखील चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.
भारतीय सैन्यांकडून पाकिस्तानचे प्रत्येक ड्रोन आणि क्षेपणास्त्र हवेत पाडले जात आहेत. जम्मू-काश्मीरपासून ते गुजरातपर्यंत पाकिस्तानने शुक्रवारी रात्री २६ ठिकाणी ड्रोन हल्ले केले. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानामध्ये मोठे स्फोट केले. भारताने पाकिस्तानमधील ४ हवाई तळांना लक्ष्य केले.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळपासून पाकिस्तानकडून भारतातील अनेक शहरांमध्ये हल्ले केले जात आहेत. पाकिस्तानच्या या हल्ल्याला भारतीय सैन्य देखील चोख प्रत्युत्तर देत आहेत. अशात पाकिस्तानातील इस्लामाबाद आणि लाहोरमध्ये मोठा स्फोट झाल्याची बातमी आहे. तर रावळपिंडीतील एअरबेसजवळही स्फोट झाला आहे. भारताने पाकिस्तानात मोठे स्फोट केले त्यामुळे पाकिस्तान पुन्हा हादरला आहे. भारताने पाकिस्तानच्या नूर खान हवाई तळ, मुरीद हवाई तळ आणि रफीकी हवाई तळासह आणखी एका हवाई तळावर हल्ला केला.
भारताच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे नूर खान हवाई तळावर मोठ्या स्फोटाचा आवाज ऐकू आला. या स्फोटात अनेक पाकिस्तानी विमाने उद्ध्वस्त झाल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानी लष्करानेही या स्फोटाची पुष्टी केली आहे. डीजी आयएसपीआर म्हणाले की, सर्व पाकिस्तानी मालमत्ता सुरक्षित आहेत. भारतीय क्षेपणास्त्र हल्ल्यात रफीकी हवाई तळालाही लक्ष्य करण्यात आले. पंजाब प्रांतातील शोरकोटजवळ स्थित हे हवाई तळ पाकिस्तानी हवाई दलासाठी धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे. हे पाकिस्तानी हवाई दलाच्या मिराज-५ लढाऊ विमानांचे तळ आहे.
इस्लामाबाद, लाहोर आणि रावळपिंडीसह पाकिस्तानच्या प्रमुख शहरांमध्ये भारताने प्रत्युत्तर म्हणून हल्ले केले. भारताने पाकिस्तानमधील तीन हवाई तळांनाही लक्ष्य केले. पाकिस्तानातील विविध शहरांमध्ये भारताद्वारे स्फोट करण्यात आले. रावळपिंडीमध्ये दोन आणि लाहोर आणि इस्लामाबादमध्ये प्रत्येकी एक स्फोट करण्यात आला.
डायरेक्टर जनरल इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी कबुल केले की, भारताने नूर खान हवाई तळ आणि रफीकी हवाई तळावर हल्ला केला. नूर खान हवाई तळ रावळपिंडीमध्ये आहे. रफीकी हवाई तळ पंजाबमधील शोरकोट येथे आहे. तर मुरीद हवाई तळ पंजाबमधील चकवाल येथे आहे.