IRCTC चा बुकींग घोटाळा ! …म्हणून काही मिनिटात कोकण रेल्वेची तिकीटं संपतात : मोठ्या प्रमाणात काळाबाजार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०७ जून ।। तुम्ही कधी आयआरसीटीसीवरुन तिकीट बुक करण्याचा प्रयत्न केला आहे का? बहुतांश वेळा तुम्हाला तिकीट संपल्याचं दिसतं. अगदी काही मिनिटांमध्ये तिकीटं संपली असा अनुभव खास करुन गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या ट्रेन्स असो किंवा विकेण्डच्या ट्रेन्स असो सर्वांसंदर्भातच येतो, नाही का? मात्र असं केवळ तुमच्यासोबत होतं असा भाग नाही. ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार आयआरसीटीसीने यामागील मोठा घोटाळा उघड केला आहे. या घोटाळ्यामुळेच देशभरातील प्रवाशांना तिकीटं बुक करताना अडचणी येत होत्या.

नेमकं काय केलं रेल्वेने?
जानेवारी ते मे 2025 दरम्यान आयआरसीटीसीने तब्बल 2.9 लाख अशी तिकीट बुकिंग्स शोधून काढली आहेत जे तिकिट बुकिंग सुरु झाल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांमध्ये तिकीटं बूक करतात. मात्र ही सर्व तिकीट बुकिंग्स सर्वसामान्य प्रवाशांकडून केली जात नसून फसवणूक करणाऱ्यांकडून केली जात असल्याचं उघड झालं आहे. ही तिकीटं ज्या खात्यांवरुन खरेदी केली जातात ती खाती खोटी माहिती देऊन आणि ऑटोमॅटिक तंत्रज्ञान वापरुन हाताळली जातात. ज्यामुळे तिकीटांची विक्री सुरु झाल्यानंतर काही वेळातच या खात्यांवरुन तिकीटं बुक केली जातात आणि सर्वसामान्यांच्या हाती निराशाच लागते.

2.5 कोटी खाती निष्क्रिय
‘द टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार भारतीय रेल्वेने या संदर्भात मोठी कारवाई केली आहे. भारतीय रेल्वेने खोटी माहिती आणि आयडी देऊन तयार केलेली अडीच कोटी खाती निष्क्रिय म्हणजेच डीअॅक्टीव्हेट केली आहेत. तसेच 20 लाख खाती रिव्हेरिफिकेशनअंतर्गत असल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी अनेक खाती ही तात्पुरत्या ईमेल आयडीवरुन तयार करण्यात आली आहेत. हे ईमेल आयडी मोजक्या वेळा वापरले जाण्यासाठीच असतात. त्यामुळेच यामागील खरे आरोपी शोधणं कठीण होतं.

मोठ्या प्रमाणात काळाबाजार
या खोट्या खात्यांच्या माध्यमातून तिकीटांची दलाली करणारे मोठ्या प्रमाणात तिकीटं बुक करतात आणि नंतर अधिक किंमतीला ती सर्वासामान्य, गरजू लोकांना विकून नफा कमवतात. सामान्यपणे उत्सवाच्या काळात आणि सुट्ट्यांच्या काळात असा तिकीटांचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात होतो.

नवी यंत्रणा
आता आयआरसीटीसीने अँटी बोट तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तिकीट बुकींग हे एखाद्या व्यक्तीमार्फतच होत असून ऑटोमॅटिक पद्धतीने तर होत नाही ना यावर नजर ठेवता येणार आहे. तसेच तिकीट विक्री आणि व्यवहार जलद व्हावेत यासाठी अधिक विकसित तंत्रज्ञान वापरण्यावर भर दिला जाणार असल्याचं आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

तक्रारीही आल्या
कन्फॉर्म तिकीटांची संख्या कमीच असून यासाठी प्रवाशांना दोष देता येणार नाही. राष्ट्रीय सायबर गुन्हे पोर्टलवर आयआरसीटीसीकडे नोंद असलेल्या 6800 हून अधिक खोट्या ईमेल आयडींची तक्रार नोंदवण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *