महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ जुलै ।। पुण्यातील प्रसिद्ध गुडलक फूड कॅफेमधील बन मस्क्यामध्ये काचेचे तुकडे आढळल्यामुळे पुण्यात खळबळ उडाली होती. पुण्यातील तरुणमंडळी मोठ्या प्रमाणात या कॅफेमध्ये येत असतात. त्यामुळे बन मस्क्यात काचेचा तुकडा आढळल्याने परिसरात खळबळ उडाली होती.
दरम्यान या प्रकरणात अन्न आणि औषध प्रशासनाने गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरता निलंबित करण्यात आला असून हॉटेल दुरुस्तीच्या कारणास्तव बंद आहे असा बोर्ड हॉटेल मालकाने लावला आहे. डेक्कन परिसरातील गुडलक कॅफेमध्ये एक दाम्पत्य नाश्त्यासाठी गेले होते. त्यांनी चहा बन मस्काची ऑर्डर दिली होती. ऑर्डर आल्यावर ते चहा घेत असताना त्यांच्या लक्षात आलं की त्यांनी घेतलेल्या बन मस्कामध्ये काचेचे तुकडे आहेत.
सुरूवातील बघितल्यानंतर त्यांना तो बर्फ वाटला होता. पण निरखून पाहिल्यावर त्यांच्या लक्षात आलं की ते बर्फाचे तुकडे नसून काचेचेच तुकडे आहेत. यानंतर त्यांनी या घटनेचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर पोस्ट केला. तसेच कर्मचाऱ्यांना जाब विचारला असता त्यावेळी त्यांच्याकडे काही उत्तर नव्हतं.
त्यानंतर या दाम्पत्यांनी एफडीएकडे याबाबत तक्रार दाखल केली. तपासणीत आढळलेल्या त्रुटी दूर होईपर्यंत गुडलक कॅफेचा परवाना निलंबित राहणार असल्याचं समोर आलं आहे. मात्र हॉटेल दुरुस्तीच्या कारणास्तव बंद आहे असा बोर्ड हॉटेल मालकाने लावला आहे.या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान आता या गुडलक कॅफेवर कशाप्रकारे कारवाई केली जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.