देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार, तारीख अन् ठिकाण झालं फिक्स

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ जुलै ।। देशातील पहिली इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी आता मुंबईत धावण्यासाठी सज्ज झाली आहे. गेटवे ऑफ इंडिया ते जेएनपीटी बंदर दरम्यान ही वाहतूक सेवा सुरू होणार आहे. यामुळे मुंबईतून नवी मुंबई विमानतळावर पोहचण्यासाठी कमी वेळ लागणार आहे. एक ऑगस्ट २०२५ पासून मुंबईमध्ये ई वॉटर टॅक्सी धावणार आहे.

ई-वॉटर टॅक्सी पर्यावरणपूरक आणि आधुनिक सुविधांनी सज्ज आहे. सप्टेंबरमध्ये नवी मुंबई विमानतळ सुरू होणार आहे, त्याआधी वॉटर टॅक्सी सुरू करण्याचं नियोजन सरकारकडून करण्यात आले आहे. त्यानुसार, दोन आठवड्यात ई-वॉटर टॅक्सी मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. ही ई-वॉटर टॅक्सी गेटवे ऑफ इंडिया ते जेएनपीए आणि डोमॅस्टिक क्रूझ टर्मिनस ते जेएनपीए या दोन जलमार्गावर नियमितपणे धावणार असल्याचे समजतेय. ई वॉटर टॅक्सीची सेवा फक्त एका मार्गासाठी मर्यादित न राहता टप्प्याटप्प्याने बेलापूर, घारापुरी आणि मांडवापर्यंत विस्तारित करण्यात येणार असल्याची माहितीही मिळाली आहे.

मुंबई आणि नवी मुंबई यादरम्यान वॉटर टॅक्सी सुरू झाल्यानंतर मुंबईकरांना प्रवासासाठी आणखी एक वेगळा मार्ग मिळणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. परवडणाऱ्या दरामध्ये वॉटर टॅक्सीमधून प्रवास करता येणार असल्याचे समजतेय. मुंबईमध्ये धावणारी ही ई-वॉटर टॅक्सी विदेशातून आयात न करता माझगाव डॉक शिपबिल्डिंग लिमिटेड (एमडीएल) यांनी पूर्णतः स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेली आहे.

कशी आहे ई-वॉटर टॅक्सी ?

लांबी : १३.२७ मीटर

रुंदी : ३.०५ मीटर

प्रवासी क्षमता : २४ प्रवासी

वेग : १४ नॉटिकल माइल्स

बॅटरी क्षमता : ६४ किलोवॅट (चार तासापर्यंत)

खिशाला परडवणारे तिकिटांचे दर
मुंबईत यापूर्वी वेगवेगळ्या मार्गांवर वॉटर टॅक्सी सेवा सुरू झाल्या होत्या, पण त्या पेट्रोल-डिझेलवर चालत असल्याने तिकिटांचे दर सामान्य प्रवाशांसाठी जास्त होते. परिणामी, त्या सेवा काही काळात बंद झाल्या. आता ई-वॉटर टॅक्सीमुळे इंधन खर्चात मोठी बचत होईल, त्यामुळे प्रवाशांना परवडणाऱ्या दरात सेवा मिळेल. शिवाय, शहरातील वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी करण्यासही यामुळे मदत होईल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *