![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ जुलै ।। पुणे शहरात बुधवारी दिवसभर ऊन व सावलीचा खेळ सुरू होता. जिल्ह्यात काही ठिकाणे वगळता शहरात दिवसभर पाऊस पडल्याची नोंद झाली नाही, तसेच कमाल तापमानातही वाढ झाल्याने उकाडा जाणवत होता. येत्या आठवडाभर शहरात आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून, हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
शहरात कोरेगाव पार्क वगळता कोठेही पावसाची नोंद झाली नाही, तसेच कमाल तापमानही वाढलेले आहे. पुढील आठवडाभरात कमाल व किमान तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
शहर आणि परिसरात बुधवारी (ता. १६) तापमान वाढले होते. कमाल तापमान जे दोन दिवसांपूर्वी २८ अंश सेल्सिअस होते ते ३१ अंशांवर, तर किमान तापमान स्थिर असून ते २२.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.
मात्र पुढील दोन दिवसांत कमाल तापमानात किंचित वाढ होऊन कमाल तापमान ३१ ते ३२ अंश सेल्सिअस तर किमान तापमान मात्र स्थिर राहून ते २१ ते २२ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविण्यात येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
