महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ ऑगस्ट ।। धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन आज पाच महिने झाले, पण अद्याप ‘सातपुडा’ हा सरकारी बंगला सोडला नसल्याचे समोर आले आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांचे नाव समोर आल्यानंतर धनंजय मुंडे अडचणीत सापडले. सत्ताधारी अन् विरोधकांच्या तीव्र विरोधानंतर अन्न व नागरीपुरवठा मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. धनंजय मुंडेंनी बंगला अद्याप सोडला नसल्यामुळे छगन भुजबळ अद्याप प्रतीक्षेत आहेत. धनंजय मुंडे यांच्याकडील दंडाची रक्कम ४२ लाख रूपये झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचे सरकार आले. धनंजय मुंडे यांना अन्न व नागरीपुरवठा मंत्रालय मिळाले होते. धनंजय मुंडे यांना सत्तेत आल्यानंतर मलबार हिल परिसारतील सातपुडा हा बंगला मिळाला होता. पण बीडमधील राजकीय गोंधळानंतर धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. मंत्रिपद सोडल्यानंतर १५ दिवसात सरकारी बंगला सोडावा लागतो. धनंजय मुंडे यांनी ४ मार्च २०२५ रोजी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. धनंजय मुंडे यांना १५ दिवसांत म्हणजे २० मार्चपर्यंत सातपुडा बंगला सोडायला हवा होता. पण धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विनंती करून सरकारी बंगला काही काळ वापरण्यासाठी परवानगी घेतली होता. धनंजय मुंडे यांनी अद्याप हा बंगला रिकामा केलेला नाही.
अन्न व नागरीपुरवठा मंत्रालय छगन भुजबळ यांच्याकडे सोपवण्यात आले. २३ मे रोजी सातपुडा हा बंगला भुजबळ यांना देण्याचा शासकीय आदेश काढण्यात आला आहे. पण अद्याप मुंडे यांनी सातपुडा बंगला सोडला नाही. चार ते पाच महिन्यात मुंडे यांना बंगला सोडा, अशी कोणतीही सरकारी नोटीस पाठवण्यात आली नाही. धनंजय मुंडे यांच्याकडून सरकारी बंगला खाली न करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाला कोणतेही कारण अद्याप दिलेले नाही.