महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०९ ऑगस्ट ।। देशभरातील ॲप आधारित टॅक्सी सेवेतील ओला, उबर कंपन्यांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी केंद्रीय सहकार विभागाच्या पुढाकाराने देशात प्रथमच सहकारी तत्त्वावर ‘भारत टॅक्सी’ सुरू करण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी बहुराज्य सहकारी टॅक्सी सेवा संस्थेची स्थापना करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली आणि उत्तर प्रदेशात ही सेवा सुरू केली जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय सहकार विकास निगममधील सूत्रांनी दिली.
गेल्या महिन्यात केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सहकार धोरणाची घोषणा करताना सहकारमंत्री अमित शहा यांनी डिसेंबरपूर्वी देशात सहकारी तत्त्वावर ॲप आधारित टॅक्सी सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार ‘भारत टॅक्सी’ ही ॲप आधारित टॅक्सी सेवा सुरू केली जाणार आहे. सहकार विभागाच्या पुढाकाराने ही योजना आखली जात आहे. यासाठी राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ (एनसीडीसी), भारतीय कृषी फर्टिलायझर सह. लि.(ईफको), गुजरात सहकारी दुग्ध विकास संस्था अशा आठ सहकारी संस्थांच्या सहभागातून बहुराज्य सहकारी टॅक्सी संस्थेची नोंदणी करण्यात आली असून त्यासाठी ३०० कोटींचे भांडवल उभारण्यात आले आहे. भारतीय कृषक सहकारी संस्था (कृभको), राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक(नाबार्ड), राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ (एनडीडीबी) आणि राष्ट्रीय सहकार निर्यात लि. याही संस्था सहकारी टॅक्सी संस्थेच्या भागधारक असून यात सरकारचा थेट सहभाग नसेल.
टप्प्याटप्प्याने देशभरात
सहकारी तत्त्वावर ‘भारत टॅक्सी’ ही सेवा टप्प्याटप्प्याने देशभरात सुरू केली जाणार.
पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली आणि उत्तर प्रदेशात सेवा सुरू केली जाणार असून त्यासाठी आतापर्यंत २०० टॅक्सी चालकांची नोंदणी.
या योजनेची शास्त्रोक्त आखणी करण्याची जबाबादरी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) बेंगळूरु यांच्यावर सोपविण्यात आली असून ॲपनिर्मितीसाठी म्हणजेच तांत्रिक भागीदारासाठी निविदा प्रक्रिया सुरू.