महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०९ ऑगस्ट ।। महाराष्ट्रातील विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र यांना थेट जोडणाऱ्या नागपूरमधील अजनी ते पुणे जंक्शन दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्यास रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली होती. येत्या रविवारी 10 ऑगस्ट 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून या सेवेचा शुभारंभ करतील. या दिवशी बेळगाव- बंगळुरु आणि अमृतसर ते श्रीमाता वैष्णौदेवी कटारा या दोन मार्गांवर देखील वंदे भारत एक्स्प्रेस 10 ऑगस्टला शुभारंभ होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटकमधून तीन वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवतील.
नागपूर मधून सुटणारी ही तिसरी वंदे भारत एक्स्प्रेस असेल. यापूर्वी नागपूर ते विलासपूर आणि नागपूर ते सिकंदराबाद या मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस सुरु आहेत. आता नागपूरमधील अजनी ते पुणे अशी वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार आहे. 10 ऑगस्टला उद्घाटन होणार असलं तरी नियमित फेऱ्या 14 ऑगस्टपासून सुरु होऊ शकतात, असं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे.
नागपूर पुणे वंदे भारत एक्स्प्रेसला अजनी (नागपूर) हून सुटल्यानंतर वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर, दौंड कॉर्ड लाइन या स्टेशनवर थांबा असेल तर अखेरचं स्टेशन पुणे असेल.
रेल्वे मंत्रालयाने नागपूर – पुणे वंदे भारत एक्सप्रेस या गाडीचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. मात्र, रेल्वे केव्हापासून सुरू होणार याची तारीख अद्याप स्पष्ट केलेली नाही. गाडी क्र.26102 अजनी (नागपूर) येथून दररोज सकाळी 9.50 वाजता सुटेल. रात्री साडे 9.50 वाजता पुण्यात पोहचेल. तर, गाडी क्र.26101 पुणे वरून सकाळी 6.25 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी 6.25 वाजता अजनी (नागपूर) स्टेशन वर पोहचेल.गाडी क्र.26101 पुणे अजनी (नागपूर) एक्सप्रेस आठवड्यात मंगळवार सोडून इतर सहा दिवस चालेल. या प्रमाणेच गाडी क्र.26102 अजनी (नागपूर) पुणे वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यात सोमवार सोडून इतर सहा दिवस चालेल.
दरम्यान, नागपूर (अजनी)- पुणे अंतर 850 किलोमीटर इतकं आहे. या मार्गावरुन धावणाऱ्या हावडा- पुणे या एक्स्प्रेसला पुणे -नागपूर अंतर पार करण्यासाठी 12 तास 50 मिनिटे लागतात. तर, पुणे- अजनी एसी स्पेशल ट्रेन 13 तास 35 मिनिटे वेळ लागतो. अजनी- पुणे वंदे भारत एक्स्प्रेस हे अंतर 12 तासात पूर्ण करेल. यामुळं विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.