महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ ऑगस्ट ।। आयात शुल्कावरून लागू केलेले नियम असो वा आणखी काही, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्या क्षणापासूनच डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांनी साऱ्या जगाचं लक्ष वेधलं. रशिया, चीन यांसारख्या राष्ट्रांसह अगदी भारतालासुद्धा ट्रम्प यांच्या धोरणांनी घाम फोडला. आता म्हणजे जागतिक राजकीय पटलावर चर्चेरचा विषय ठरलेला हाच नेता एका विवंचनेत अडकला आहे, ज्यामुळं खुद्द त्यांचाच त्यांनाही धोका असल्याचं म्हटलं जात आहे.
मानसोपचार तज्ज्ञांनी ट्रम्प यांचं मानसिक विश्लेषण करत काय म्हटलं?
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मानसिकतेवर हे भाष्य बहुतांश मानसोपचार तज्ज्ञांनी त्यांना प्रत्यक्षात न भेटता एकंदर त्यांचं व्यक्तीमत्त्वं, त्यांचे विचार आणि त्यांची देहबोली यांना अनुसरून मांडले. काही जाणकार आणि निरीक्षणकर्त्यांच्या मते ट्रम्प यांचं एकंदर व्यक्तिमत्त्वं पाहता त्यात नार्सिसिस्ट पर्सनॅलिटी डिसऑर्डरची लक्षणं दिसतात, ज्यामधघ्ये व्यक्तीला फक्त आणि फक्त स्वत:चीच काळजी असते. अशा व्यक्ती इतरांबाबत सहानुभूती दर्शवत नाहीत.
काही निरीक्षणकर्त्यांच्या मते ट्रम्प यांची मानसिक स्थिती ‘सायकोपॅथिक पर्नसनॅलिटी डिसऑर्डर’मध्ये मोडते. जिथं, अत्याधिक आवेग, इतरांवर वर्चस्व प्रस्थापित करण्याचा मोह आणि पश्चातापाचा अभाव असे गुण दिसून येतात. मनोविश्लेषक डॅन मॅकअॅडम्स यांच्या दाव्यानुसार ट्रम्प यांच्या असाधारण ग्रँडियोसिटी आणि किमान तडजोड करण्याची प्रवृत्तीच कायम प्रकर्षानं पुढे येते. तर, जॉन गार्टनरसारख्या मनोवैज्ञानिकांच्या सांगण्यानुसार ट्रम्प यांना मॅलिग्नंट नार्सिसिस्ट म्हटलं जाऊ शकतं. म्हणजेच एक अशी व्यक्ती जी आत्मकेंद्री आहे, जी सतत खोटं बोलते आणि त्यांच्या मनात इतरांप्रती अतिशय कमी सहानुभूती असते.
दरम्यान मानसोपचारतज्ज्ञांच्या वर्तुळात लोकप्रिय असणाऱ्या ‘सायकोलॉजी टुडे’ या नियतकालिकामध्ये अमेरिकेतील अनेक मानसोपचारतज्ज्ञांनी ट्रम्प यांच्या व्यक्तीमत्त्वाचं निरीक्षण आणि अभ्यास केला. ज्याआधारे त्यांना काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं देता आली. सायकोलॉजी टुडेच्या माहितीनुसार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचं व्यक्तीमत्त्वं अतिशय विचित्र आणि धीट आहे, ते रागीट असून, त्यांचं वागणं एंटीसोशल पर्सनालिटी डिसऑर्डरसह पॅरानॉईड पर्सनालिटी डिसऑर्डरमध्ये मोडणारं दिसतं. थोडक्यात ट्रम्प यांच्या या वागण्याचा अभ्यास केला असता त्याचा थेट संबंध त्यांच्या भूतकाळातही घेऊन जातो. जिथं त्यांच्या आई- वडिलांच्या स्वभावाचाही ट्रम्प यांच्यावर बहुतांश परिणाम झाल्याचं म्हटलं जातं. प्रत्यक्षात वागण्याचा हा प्रकार फक्त त्या व्यक्तीसाठीच नव्हे, तर त्यांच्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांसाठीसुद्धा अनेकदा धोकादायक ठरु शकतो असं अभ्यासकांचं मत.