महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १४ ऑक्टोबर | Maharashtra Weather News : मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मागील 48 तासांपासून उकाडा तुलनेनं वाढल्याचं पाहायला मिळत आहे. सूर्य डोक्यावर आल्यानंतर उष्मा अधिक जाणवत असून, शहराच्या किनारपट्टी भागांमध्ये आणि खाडी क्षेत्रांमध्ये हवेत असणाऱ्या आर्द्रतेमुळं सूर्याचा दाह अधिक तापदायक ठरत आहे. तिथं कोकण, विदर्भाकतही अशीच स्थिती असून, कमाल तापमानाचा आकडा 34 अंशांपर्यंत पोहोचला आहे. राज्यात अद्यापही थंडीची सुरूवात झालेली नसून, मान्सूननं मात्र वेगानं माघार घेतल्याचं पाहायला मिळत आहे. तरीही राज्याच्या काही भागांमध्ये थेट विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा का बरं देण्यात आलाय?
महाराष्ट्रातून मॉन्सून हद्दपार: आयएमडी
गडचिरोलीचा काही भाग वगळता महाराष्ट्राच्या बहुतांश भागांतून आणि किनारपट्टी राज्य असणाऱ्या गोव्यातून सोमवारी (13 ऑक्टोबर) मॉन्सूननं परतीच्या वाटेदरम्यान हद्द ओलांडली. परतीच्या मॉन्सूनची दक्षिणसीमा कारवार, कलबुर्गी, निजामाबाद, कांकेर, केओंझारगड, सागर बेट, गुवाहाटी मार्गे जात आहे. ज्यामुळं पुढच्या 2 ते 3 दिवसांत मॉन्सून तेलंगणा, छत्तीसगड, ओडिशा आणि ईशान्येकडील राज्यांच्या उर्वरित भागांतूनही बाहेर पडण्याची शक्यता वर्चवण्यात येत आहे.
एकिकडे मान्सूननं माघार घेतल्याचं वृत्त असलं तरीही राज्याच्या दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरींचा प्राथमिक अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात तामिळनाडूच्या दक्षिण किनारपट्टी लगत चक्राकार वारे तयार होत असल्या कारणानं राज्यात पावसासाठी पोषक वातावरणनिर्मिती होत आहे.
देशाच्या उत्तरेकडे वाढला थंडीचा कडाका
जम्मू काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश यांसारख्या राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली असून, त्याचा परिणाम राजस्थान, मध्य भारतापर्यंत दिसत असून इथंही तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. अतीव पर्वतीय भागांमध्ये हिमवर्षावास सुरुवात झाली असून, तिथून वाहत येणाऱ्या शीतलहरींचा प्रभाव आता महाराष्ट्रापर्यंत कधी पोहोचचो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.