![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक ६ डिसेंबर २०२५ | राज्यातील हवामान पुन्हा थंडीचा मोर्चा काढताना दिसत आहे. दिवसाढवळ्या उन्हाच्या चटक्यात वाढ झाली असली तरी पहाटेचा गारठा अजूनही अंगात शिरणारा आहे. किमान तापमानात दोन दिवसांत पुन्हा घट होणार असून गुलाबी थंडीची चाहूल हवामान खात्याने दिली आहे. नागपूर, संभाजीनगर, नंदुरबार आणि जळगाव परिसरात थंडीचा चटका जास्त जाणवत आहे.
धुळे व निफाडसारख्या पट्ट्यात तर वातावरणाने किमान तापमानात जोरदार घसरण नोंदवली. धुळ्यातील कृषी महाविद्यालयात राज्यातील सर्वात कमी—८.६ अंश—तर निफाडच्या गहू संशोधन केंद्रात ९.९ अंश तापमानाची नोंद झाली. राज्यातील इतर ठिकाणी पारा १० अंशांच्या वर गेल्याने काही प्रमाणात गारठा कमी झाला असला, तरी पुढील ४८ तासांत पुन्हा चटका वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तर थंडीने अक्षरशः दणका दिला आहे. मागील आठवड्यापर्यंत विश्रांती घेतलेली थंडी या आठवड्यात अचानक परतली आणि ग्रामीण भागात शेकोट्या पेटण्याचे प्रमाण वाढले. सकाळ-संध्याकाळ लोकांनी उबेसाठी लोकर, जॅकेट आणि उबदार कपड्यांचा आधार घेतला आहे. थंडीच्या पुनरागमानाने बाजारातही हिवाळी वस्तूंची मागणी वाढली आहे.
नागपूर आणि जळगावमध्येही तापमानाचा खेळ रंगला आहे. नागपूरचा पारा १०.८ अंशांवर पोहोचताच शहरात गारवा अधिक घट्ट झाला आहे. पूर्वेकडील वाऱ्यांचा जोर कमी झाल्याने विदर्भात थंडीची लाट पुन्हा रुंजी घालत आहे. तर जळगावमध्ये किमान तापमान मागील तीन दिवसांपासून १२.६ अंशांवर स्थिरावले असून पुढील दोन दिवसांत ते ९ अंशांपर्यंत कोसळण्याचा अंदाज आहे. सकाळी वाढणाऱ्या धुक्यामुळे दृश्यमानता ४०० मीटरांपर्यंत खाली येण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे.
