✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक ८ डिसेंबर २०२५ | फेब्रुवारी २०२२ पासून सुरू असलेल्या रशिया–युक्रेन युद्धावर पडदा टाकण्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, या प्रयत्नांना युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेंस्की यांनी प्रतिसाद न दिल्याने ट्रम्प यांनी जगासमोरच नाराजी व्यक्त केली.
वॉशिंग्टन डी.सी. येथील केनेडी सेंटर ऑनर्स मधील रेड कार्पेटवर ट्रम्प यांनी आपली व्यूहरचना, टॅरिफ धोरण आणि शांततेचे प्रयत्न उघड केले.
“८ युद्धे थांबवली… पण हे युद्ध वेगळंच!” — ट्रम्पचा भावनिक सूर
ट्रम्प म्हणाले—“मी आतापर्यंत आठ युद्धांना पूर्णविराम दिला. त्यामुळे मला वाटलं होतं की रशिया–युक्रेन संघर्ष थांबवणं तुलनेत सोपं जाईल… पण तसे अजिबात नाही.”
त्यांनी यामागील प्रमुख कारणही सांगितलं—
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि झेलेंस्की या दोघांशी सातत्याने चर्चा सुरू असली तरी, अंतिम निर्णय युक्रेनच्या प्रतिक्रियेवरच अवलंबून आहे.
“अमेरिकेचा शांतता प्रस्ताव झेलेंस्की यांनी वाचलाच नाही!” — ट्रम्पची टोचणी
सर्वात धक्कादायक खुलासा म्हणजे— ट्रम्प यांच्या मते अमेरिकेने दिलेला शांतता प्रस्ताव झेलेंस्की यांनी अजून उघडूनही पाहिलेला नाही!“तो प्रस्ताव त्यांनी वाचलाच नाही… यामुळे मला खूप निराशा वाटते,” — ट्रम्प. अमेरिकेच्या प्रस्तावावर रशियाची प्राथमिक सहमती दिसत असून, आता बॉल युक्रेनच्या कोर्टात असल्याचे ट्रम्प स्पष्ट करतात.
युद्ध थांबण्याची किल्ली झेलेंस्कीकडेच
ट्रम्प यांनी मध्यस्थीची भूमिका बजावली असली तरी झेलेंस्कींचा प्रतिसाद न मिळाल्याने शांततेचा मार्ग अडखळला आहे. ट्रम्पच्या टॅरिफ धोरणांमुळे आणि ‘युद्ध-थांबवण्याच्या’ दाव्यामुळे पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय राजकारण हललं आहे. रशिया–युक्रेन संघर्षाचा शेवट अखेर झेलेंस्की यांच्या भूमिकेवरच ठरणार, हे ट्रम्प यांनी स्पष्टपणे दाखवून दिलं आहे.
