![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक : २३ डिसेंबर २०२५ | नवीन वर्ष येतंय म्हटलं की लोक ठराव करतात—डाएट सुरू करू, व्यायाम करू, बचत करू! पण केंद्र सरकारने यंदा एक वेगळाच ठराव सर्व भारतीयांसाठी जाहीर केला आहे—“आधार आणि पॅन लिंक करा, नाहीतर १ जानेवारीपासून आर्थिक आयुष्याला ब्रेक!”
आजच्या काळात सरकारी काम असो की खासगी व्यवहार, आधार आणि पॅन ही जोडी म्हणजे आधुनिक भारताची ओळखपत्रं झाली आहेत. बँक खाते उघडायचं, आयकर रिटर्न भरायचा, गुंतवणूक करायची, मालमत्ता खरेदी करायची—सगळीकडे ही दोन कागदपत्रं पुढे येतात. मात्र ही जोडी जर एकमेकांशी लग्नबद्ध नसेल, तर सरकार आता थेट कारवाईच्या मूडमध्ये आहे.
केंद्र सरकारने स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे की, ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत आधार–पॅन लिंक केलं नाही, तर १ जानेवारीपासून पॅन कार्ड निष्क्रिय होईल. आणि निष्क्रिय पॅन म्हणजे फक्त एक प्लास्टिक कार्ड—ना किंमत, ना उपयोग! सरकार म्हणतंय, “आम्ही आधीच सांगितलं होतं.” आणि नागरिक म्हणतोय, “अजून वेळ आहे असं वाटलं!”
पॅन निष्क्रिय झालं तर काय होईल? तर आयकर रिटर्न भरताना अडचणी, बँकिंग व्यवहार ठप्प, गुंतवणुकीवर ब्रेक, मालमत्तेच्या व्यवहारांवर मर्यादा—थोडक्यात काय, पैसा आहे पण वापर करता येत नाही, अशी अवस्था होऊ शकते. “सरकारने नोटाबंदी केली नव्हती, पण आता पॅनबंदी केलीय!”
सरकारचं म्हणणं आहे की, करप्रणाली अधिक पारदर्शक करण्यासाठी आणि बनावट पॅन रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे. विशेषतः ज्यांनी आधार नोंदणी आयडीवर पॅन काढला होता, त्यांनी आता प्रत्यक्ष आधार क्रमांक आयकर विभागाला देणं बंधनकारक आहे.
अर्थात, पॅन निष्क्रिय झालं तरी जग संपत नाही. ते पुन्हा सक्रीय करता येतं. पण त्यासाठी आधार लिंक करावं लागेल आणि १,००० रुपयांचा दंड भरावा लागेल. म्हणजे उशीर केला, तर खिशाला कात्री लागणारच!
सुखाची गोष्ट एवढीच की, हे सगळं काम घरबसल्या करता येतं. आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर काही मिनिटांत पॅन–आधार लिंकिंग पूर्ण होते. कुठे रांग नाही, कुठे अर्ज नाही—फक्त थोडं लक्ष आणि ओटीपी!
म्हणूनच, नवीन वर्षाच्या शुभेच्छा स्वीकारण्याआधी एक काम नक्की करा—आधार आणि पॅन लिंक आहे का, ते तपासा. कारण १ जानेवारीपासून सरकार एकच उत्तर देईल—“वेळ संपली!”
