महाराष्ट्रातील श्रीमंत मराठा आमदारांना आरक्षण नकोय; प्रकाश आंबेडकरांचा आरोप

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १३ सप्टेंबर – पुणे -:महाराष्ट्रातील श्रीमंत मराठा आमदारांना त्यांच्या समाजासाठी आरक्षण नको आहे, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केला. त्यांनी ट्विट करून यासंदर्भातील आपली भूमिका मांडली आहे. यामध्ये प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात २८८ पैकी १८२ श्रीमंत मराठा आमदार आहेत. हे श्रीमंत आमदार नात्यागोत्यात राजकारण बंदिस्त करून गरिब मराठ्यांसह इतर सर्वांना व्यवस्थेतून बाहेर ठेवतात. गरीब मराठ्यांसाठी हे लढत नाहीत. गरीब मराठ्यांनी श्रीमंतांविरुद्ध स्वतःचा लढा उभारावा. अन्यथा त्यांना आरक्षणावर पाणी सोडावे लागेल, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला.

काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा खटला घटनापीठाकडे वर्ग केला होता. मात्र, यावेळी न्यायालयाने राज्यातील मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली होती. त्यामुळे या मुद्द्यावरून सध्या महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे.

राज्य सरकारने आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिकाही दाखल केली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी सधअया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील विविध तज्ज्ञांशी चर्चा करत आहेत. मराठा आरक्षणाच्याबाबतीत राज्य सरकार तसूभरही मागे हटणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली होती. हा लढा आपल्या सर्वांचा आहे. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जे जे काही करता येईल ते सर्व करू. यासंदर्भात आम्ही सर्व संबंधितांनाही विश्वासात घेऊन , त्यांच्या सूचनांचा विचार करणार आहोत. विरोधी पक्ष नेत्यांशी देखील या विषयावर सविस्तर बोलण्यात येईल. सरकार या प्रश्नी सुरुवातीपासून प्रामाणिक आहे आणि तळमळीने हा प्रश्न सोडवू इच्छिते पण राजकारणासाठी मराठा समाजाला भडकविण्याचे आणि आगी लावण्याचे काम आपण सहन करत कामा नये, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *