तीन तासांचा रस्ता, आता १२ मिनिटांचा आकाशमार्ग! २०२८ पासून दिल्लीत एअर टॅक्सी; भाडे फक्त ५०० रुपये?

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. १५ फेब्रुवारी २०२६ || दिल्लीतल्या ट्रॅफिकला जर पंख फुटले, तर ते असे! २०२८ पासून राजधानीच्या आकाशात एअर टॅक्सी झेपावतील, आणि आयजीआय विमानतळावरून आनंद विहारला जाणारा एक ते तीन तासांचा प्रवास फक्त १० ते १२ मिनिटांत पूर्ण होईल—तेही सुरुवातीच्या अंदाजे ५०० रुपयांत! पंजाबमधील मोहाली येथील Nalva Aero या स्टार्टअपने स्वदेशी ईव्हीटॉल (इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक-ऑफ अँड लँडिंग) विकसित केली आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून डिझाइन ऑर्गनायझेशन अप्रूव्हलही मिळाले. धावपट्टीची वाट न पाहता थेट उड्डाण—ना हॉर्न, ना सिग्नल, ना जाम. दिल्ली-एनसीआरमध्ये सुरुवात; पुढे मुंबई, कोलकाता, बेंगळुरू अशी महानगरांची रांग.

कंपनीचे सीईओ Kuljitsingh Sandhu सांगतात, कोविडकाळात आपत्कालीन वैद्यकीय वाहतुकीची गरज जाणवली आणि कल्पना आकाराला आली. आठ रोटरची सुरक्षा—दोन निकामी झाले तरी सुरक्षित लँडिंग; हेलिकॉप्टरपेक्षा १० पट शांत आणि परिचालन खर्च ९०% पेक्षा अधिक स्वस्त, असा दावा. हेलिकॉप्टरचा तासाचा खर्च ५ लाखांपर्यंत; ईव्हीटॉल त्याच्या दहाव्या भागात! २०२८ पासून प्रवासी उड्डाणे पायलटसह; तीन वर्षांनी स्वायत्त उड्डाणांचा विचार. नियमांचे पालन पूर्ण झाल्याशिवाय आकाशात झेप नाही—अशी भूमिका. जागतिक बाजारपेठ २०५० पर्यंत ९ ट्रिलियन डॉलरपर्यंत जाईल, असा अंदाज; भारत स्वस्त अभियांत्रिकी आणि उत्पादन खर्चामुळे स्पर्धेत आघाडी घेऊ शकतो.

तंत्रज्ञानही तितकेच थरारक—लिथियम-आयन मॉडेल एका चार्जवर ९० मिनिटे किंवा ३०० किमी; हायड्रोजन फ्युएल सेल मॉडेल ८०० किमीपर्यंत. ५० मिनिटांत चार्जिंग, ५ ते ७ आसनी प्रवासी आवृत्ती, दोन स्ट्रेचरसह एअर ॲम्ब्युलन्स, कार्गो मॉडेल—सगळे सज्ज. १२x१२ मीटर जागेत व्हर्टिकल टेक-ऑफ-लँडिंग; मेट्रो स्थानकांच्या छतांवर व्हर्टीपोर्टची शक्यता. झिरो कार्बन, फ्लाय-बाय-वायर, स्वदेशी डिझाइन—‘मेक इन इंडिया’चा दावा. प्रश्न फक्त एक: ५०० रुपयांत आकाशमार्गाची स्वप्ने खरोखरच सर्वसामान्यांच्या हातात येणार, की ती फक्त जाहिरातींच्या पंखांवरच उडणार? २०२८ फार दूर नाही; ट्रॅफिकच्या कोंडीत अडकलेल्या शहराची नजर आता आकाशाकडे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *