पुढच्या 24 तासांसाठी घाम फोडणारा अलर्ट; वाऱ्याची दिशा ठरवतेय बदल!

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दिनांक २६ फेब्रुवारी २०२६।।राज्यात अवकाळी पावसाच्या सरी ओसरत असतानाच आता पुन्हा उष्म्याचा तडाखा वाढण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाने हजेरी लावून नुकसानीची भर टाकली असताना, वाऱ्यांची दिशा बदलल्याने पुढील २४ तासांत तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मध्य महाराष्ट्राच्या परिसरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली असून तामिळनाडूपासून मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने हवामानात चढ-उतार पाहायला मिळत आहेत.

कोकणापासून विदर्भापर्यंत स्थिती कशी?

कोकण किनारपट्टी भागात हवामान उष्ण आणि दमट राहील. आर्द्रतेमुळे प्रत्यक्ष तापमानापेक्षा अधिक उकाडा जाणवणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, पुणे आणि कोल्हापूरमध्ये प्रामुख्याने कोरडे हवामान राहील. राज्यात कमाल तापमान ३५ ते ३७ अंश सेल्सिअस दरम्यान, तर किमान तापमान २३ ते २४ अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी आकाश अंशतः ढगाळ राहील, तर काही भागांत कडक उन्हाचा दाह वाढेल.

मुंबईत प्रदूषणात दिलासा

दरम्यान, मुंबई शहरात प्रदूषणाच्या पातळीत घट झाल्याने हवेची गुणवत्ता ‘समाधानकारक’ श्रेणीत पोहोचली आहे. २५ फेब्रुवारी रोजी शहराचा सरासरी AQI ८९ नोंदवण्यात आला. वाढलेल्या वाऱ्याच्या वेगामुळे धुरकट वातावरण कमी झाले असून दृश्यमानता सुधारली आहे.

अवकाळीचा पिकांवर परिणाम

मराठवाड्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे सुमारे १९ हजार हेक्टरवरील रबी पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. लातूर, नांदेड, परभणी, धाराशिव आणि बीड जिल्ह्यांत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी वीज कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला असून चार जनावरे दगावल्याची नोंद आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

सोमवारी छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांत ढगाळ वातावरण होते, तर बीड आणि लातूरमध्ये गारपीट झाली. हवामानातील या सततच्या बदलामुळे नागरिकांसह शेतकरीही चिंतेत आहेत. पुढील काही दिवस तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *