Pune Nashik Semi High Speed Rail ‘नो सिग्नल’ची शिट्टी! पुणे-नाशिक रेल्वेला रेडिओ दुर्बिणीचा अडथळा; नवा मार्ग ३-४ महिन्यांत?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दिनांक २६ फेब्रुवारी २०२६।। पुणे–नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या सरळ मार्गाला केंद्राकडून ‘नो सिग्नल’ मिळाला आणि स्वप्नरंजनाचा इंजिन थोडा वेळ थांबला. कारण एकच—नारायणगाव येथील Giant Metrewave Radio Telescope (जीएमआरटी)चा ‘बफर झोन’. या वैज्ञानिक प्रकल्पाभोवती निश्चित केलेल्या संरक्षित पट्ट्यातून रेल्वेचा मूळ आराखडा जात असल्याने तांत्रिक मान्यता देता येत नसल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे. परिणामी, आता कमीत कमी वळसा घेणारा आणि तरीही महत्त्वाची गावे सामावून घेणारा पर्यायी मार्ग शोधण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

विधान परिषदेत आमदार सत्यजित तांबे यांनी या बदलाबाबत प्रश्न उपस्थित करत माहिती अधिकाराचा दाखला दिला. जीएमआरटीकडून थेट तांत्रिक आक्षेप नोंदवला नसल्याचे सांगितले जात असताना मार्ग का बदलला जातोय, असा त्यांचा सवाल होता. प्रकल्पामुळे काही शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असून समृद्धी महामार्ग परिसरात आंदोलनांची नोंद झाली आहे. सरळ ‘अलाइनमेंट’ हीच लोकप्रतिनिधींची अपेक्षा असल्याचेही त्यांनी नमूद केले आणि संयुक्त बैठकीची मागणी केली.

यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोनदा केंद्राकडे सादरीकरण केल्याची माहिती देत स्पष्ट केले, की तज्ज्ञ सल्लागार समिती नव्या मार्गाचा सविस्तर अभ्यास करेल. रेडिओ दुर्बिणीच्या ‘बफर झोन’चा वैज्ञानिक आणि तांत्रिक आढावा घेऊन ‘कमीत कमी वळसा’ हा निकष ठेवला जाईल. तज्ज्ञांना अहवालासाठी ३ ते ४ महिन्यांची मुदत देण्यात येईल, तसेच मार्ग बदलताना जास्तीत जास्त महत्त्वाची गावे रेल्वे नकाशावर राहतील याची दक्षता घेतली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

पुणे–नाशिक ही औद्योगिक आणि शैक्षणिक दृष्टीने महत्त्वाची पट्टी. दोन्ही शहरांमधील दळणवळण वेगवान करण्यासाठी हा सेमी हायस्पीड प्रकल्प महत्त्वाकांक्षी मानला जातो. मात्र विकासाच्या रेषा आखताना विज्ञानाची वर्तुळे ओलांडता येत नाहीत, हे या प्रकरणातून पुन्हा अधोरेखित झाले आहे. आता प्रश्न एवढाच—नवा मार्ग खरोखरच ‘कमीत कमी वळसा’ घेईल का, की रेल्वेची शिट्टी अजून काही काळ प्रतिक्षेतच राहील?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *