✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३१ मार्च २०२६ ।। महिलांच्या विश्वासाचा गैरफायदा घेत प्रसादाच्या नावाखाली गुंगी आणून लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एसआयटीच्या चौकशीत अशोक खरात याचे भयंकर कारनामे समोर येत असून, आतापर्यंत ११ तक्रारी आणि ५६ अश्लील व्हिडिओंचा तपासात समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. अडचणीत सापडलेल्या महिलांना लक्ष्य करत त्यांचा विश्वास संपादन करून त्यांना आपल्या जाळ्यात ओढण्याची ही पद्धत असल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे.
तपासानुसार, खरात आपल्या कार्यालयात येणाऱ्या महिलांना प्रसाद म्हणून पेढा आणि पिण्यासाठी कडवट किंवा खारट चवीचे पाणी देत असे. हे सेवन केल्यानंतर महिलांना गरगरणे, मळमळ होणे आणि शुद्ध हरपल्यासारखे वाटत असल्याची तक्रार पीडितांनी केली आहे. त्यानंतर आरोपी महिलांवर अत्याचार करत असल्याचे समोर आले आहे. कौटुंबिक समस्या, मूल न होणे, आर्थिक अडचणी अशा कारणांनी मदतीच्या शोधात आलेल्या महिलांना लक्ष्य करून हा प्रकार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, या ‘प्रसादा’मध्ये नेमके कोणते रसायन वापरले जात होते, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी न्यायालयात सांगितले की, आरोपीने याबाबत कोणतीही ठोस माहिती दिलेली नाही. त्यामुळे या प्रकरणातील गूढ अधिकच गडद होत आहे. तपास यंत्रणा आता या गुन्ह्यामागील संपूर्ण साखळी उलगडण्याच्या तयारीत असून, पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढील कारवाई वेगाने सुरू आहे.
