Akshay Tritiya: अक्षय्य तृतीयेची सुवर्णधूम; एका दिवसात हजार कोटींची उलाढाल, वाहनखरेदीतही विक्रमी उसळी

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० एप्रिल २०२६ ।। जळगाव : सोन्याच्या आणि चांदीच्या किमती गगनाला भिडलेल्या असतानाही अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्रभर खरेदीचा उत्साह अक्षरशः ओसंडून वाहताना दिसला. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या दिवसाला ‘सोनं विकत घेण्याचा दिवस’ अशीच ओळख लाभली असून, यंदाही ग्राहकांनी त्याला तितक्याच श्रद्धेने आणि उत्साहाने प्रतिसाद दिला. राज्यभरातील सराफा बाजारात दिवसभर ग्राहकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. परिणामी, एका दिवसात तब्बल एक हजार कोटी रुपयांहून अधिक उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर अनेक कुटुंबांनी याच दिवशी दागिन्यांची मोठी खरेदी केली. काहींनी गुंतवणुकीच्या दृष्टीने सोन्याची नाणी, शिक्के, वेढे घेतले, तर काहींनी पारंपरिक दागिन्यांना आधुनिक डिझाइनची जोड देत नव्या खरेदीचा आनंद घेतला.

यंदा विशेष म्हणजे ग्राहकांनी केवळ नवे दागिने खरेदी करण्यावर भर दिला नाही, तर जुन्या दागिन्यांची अदलाबदल करून त्यात भर घालून नवीन दागिने घेण्याकडेही मोठा कल दिसून आला. वाढत्या सोन्याच्या दरामुळे वजनाने हलके, पण आकर्षक आणि वापरायला सोयीचे दागिने अधिक पसंतीस उतरले. महिलांनी दैनंदिन वापरासाठी योग्य अशा साखळ्या, अंगठ्या, बांगड्या, कानातील दागिने यांना प्राधान्य दिले. तर गुंतवणूकदारांनी सोन्याच्या नाण्यांवर भर दिला. सराफा व्यावसायिकांच्या मते, ग्राहक आता केवळ परंपरा म्हणून नव्हे, तर ‘स्मार्ट इन्व्हेस्टमेंट’ म्हणून सोन्याकडे पाहू लागले आहेत. त्यामुळे प्रत्येक खरेदीत नियोजन, बजेट आणि भविष्यातील सुरक्षिततेचा विचार स्पष्टपणे जाणवत आहे.

अक्षय्य तृतीयेचा प्रभाव केवळ सराफा बाजारापुरता मर्यादित राहिला नाही, तर वाहन बाजारातही त्याची झळाळी दिसून आली. मुंबईत अवघ्या नऊ दिवसांत तब्बल ७०७२ वाहनांची विक्रमी नोंदणी झाली. दुचाकींपासून चारचाकींपर्यंत ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर बुकिंग केली. अनेकांनी ‘शुभ दिवशी गाडी घरात यावी’ या भावनेने वाहन खरेदीला प्राधान्य दिले. विविध वाहन कंपन्यांनी आकर्षक सवलती, कमी डाउन पेमेंट, एक्सचेंज ऑफर्स आणि सुलभ कर्जयोजना जाहीर केल्यामुळे ग्राहकांचा प्रतिसाद आणखी वाढला. सकाळपासूनच शोरूमबाहेर रांगा लागल्या होत्या. यंदाची अक्षय्य तृतीया केवळ परंपरेचा उत्सव न राहता आर्थिक चैतन्याची मोठी लाट ठरली असून, बाजारपेठेला नवसंजीवनी देणारा हा दिवस व्यापाऱ्यांसाठीही सोन्याहून पिवळा ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *