महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ मे २०२६ ।। महाराष्ट्राच्या राजकारणात आता नव्या वादळाची चाहूल लागली आहे. निवडणूक आयोगाच्या सखोल विशेष फेरतपासणी मोहिमेमुळे तब्बल ९० लाख ते एक कोटी मतदारांची नावे मतदारयादीतून वगळली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. म्हणजेच, मतदारयादीचा “फुगवटा” फुटणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे. राज्यात सध्या जवळपास ९ कोटी ८८ लाख नोंदणीकृत मतदार आहेत; मात्र ‘एसआयआर’ प्रक्रियेनंतर त्यातील ८ ते १२ टक्के नावे कमी होऊ शकतात, असा प्राथमिक अंदाज निवडणूक आयोगाने व्यक्त केला आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांपूर्वीच राजकीय वातावरण तापू लागले आहे. “मतदार शोधा आणि नाव वाचवा” अशी वेळ आता अनेकांवर येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
विशेष म्हणजे मुंबई, ठाणे, पुणे आणि नवी मुंबईसारख्या शहरी भागांमध्ये सर्वाधिक मतदार बाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रोजगारासाठी होणारे स्थलांतर, दुबार नोंदणी आणि अस्थायी वास्तव्यास असलेली लोकसंख्या हे त्यामागचे प्रमुख कारण मानले जात आहे. अनेक नागरिकांची मूळ गावात आणि कामाच्या शहरात अशा दोन्ही ठिकाणी मतदार नोंदणी असल्याचे आयोगाच्या निदर्शनास आले आहे. परिणामी दुबार नावे हटवण्याची प्रक्रिया अधिक वेगाने सुरू करण्यात आली आहे. मुंबई उपनगरात केवळ ३५.३१ टक्के, पुण्यात ४२.३३ टक्के आणि ठाण्यात ४४.८२ टक्केच पडताळणी पूर्ण झाल्याचे समोर आले आहे. याउलट गडचिरोली जिल्ह्यात ९० टक्क्यांहून अधिक पडताळणी पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे. शहरी भागात नागरिकांचे सतत होणारे स्थलांतर आणि बदलते पत्ते यामुळे मॅपिंग प्रक्रियेत मोठ्या अडचणी येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
दरम्यान, या प्रक्रियेमुळे राजकीय पक्षांची धडधड वाढली आहे. कारण मतदारयादीतील प्रत्येक नाव हे निवडणुकीतील भवितव्य ठरवणारे असते. अनेक ठिकाणी मृत मतदारांची नावे अजूनही यादीत असल्याचे समोर आले असून, त्यांचीही छाननी सुरू आहे. त्यामुळे निवडणूक आयोग “स्वच्छ मतदारयादी”चा दावा करत असला, तरी विरोधकांकडून या मोहिमेकडे संशयाने पाहिले जात आहे. “चुकीची नावे वगळा; पण जिवंत मतदार गायब होता कामा नयेत,” अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. सामान्य नागरिकांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, स्वतःचे नाव यादीत आहे की नाही, हे तपासण्यासाठी अनेकांनी निवडणूक कार्यालयांकडे धाव घेतली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आता मतदारयादीच नवा रणांगण ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
