![]()
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ मे २०२६ ।। चारधाम यात्रेला निघालेल्या भाविकांच्या श्रद्धेवर आता सायबर चोरट्यांनीच डल्ला मारायला सुरुवात केली आहे. केदारनाथच्या दर्शनासाठी हेलिकॉप्टर बुकिंग, व्हीआयपी पास आणि तात्काळ नोंदणीच्या आमिषाने हजारो भाविकांना ऑनलाइन जाळ्यात ओढले जात असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. पोलिसांनी याबाबत तातडीची अॅडव्हायझरी जारी करत नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. श्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या या डिजिटल लुटीमुळे अनेक कुटुंबांचे बँक खाते रिकामे झाले असून, यात्रेचा आनंद क्षणार्धात धक्क्यात बदलत आहे. विशेष म्हणजे हे सायबर ठग इतक्या सफाईने बनावट वेबसाइट्स आणि सोशल मीडिया पेज तयार करतात की, सुशिक्षित लोकसुद्धा त्यांच्या जाळ्यात अडकतात. “देवदर्शनाच्या आधीच खात्यातील लक्ष्मी गायब!” अशी वेळ अनेकांवर आली आहे.
रुद्रप्रयागच्या एसपी निहारिका तोमर यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांत हेलिकॉप्टर सेवांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर फसवणूक वाढली आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि बनावट वेबसाइट्सच्या माध्यमातून भाविकांना ‘तात्काळ बुकिंग’, ‘कन्फर्म सीट’ आणि ‘व्हीआयपी दर्शन’चे आमिष दाखवले जाते. पैसे भरताच फोन बंद, वेबसाइट गायब आणि ग्राहकाची फसवणूक — हा ठरलेला खेळ आहे. पोलिसांनी या प्रकरणांवर नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष पथक तयार केले असून, आतापर्यंत तब्बल ५५ ऑनलाइन माध्यमांवर कारवाई करण्यात आली आहे. अनेक बनावट अकाउंट्स, बँक खाती आणि मोबाईल नंबर शोधून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पण इंटरनेटच्या महासागरात हे ठग पुन्हा नव्या नावाने उभे राहत असल्याने प्रशासनालाही मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
चारधाम यात्रेला जाणाऱ्या भाविकांनी आता श्रद्धेबरोबरच सावधगिरीही बाळगणे अत्यावश्यक झाले आहे. अधिकृत वेबसाइटवरूनच हेलिकॉप्टर किंवा हॉटेल बुकिंग करावे, सोशल मीडियावरील आकर्षक ऑफर्सवर विश्वास ठेवू नये आणि व्हॉट्सअॅपवर आलेल्या लिंकवर क्लिक करताना दहा वेळा विचार करावा, असा सल्ला पोलिसांनी दिला आहे. कारण आजकाल ठगांचा ‘डिजिटल प्रसाद’ इतका गोड असतो की, माणूस देवाच्या नावानेच फसतो! काही हजार रुपये वाचवण्याच्या मोहात लाखोंचा फटका बसू शकतो. त्यामुळे चारधाम यात्रेला निघताना बॅगेत कपड्यांइतकीच सायबर सावधगिरीही भरून घ्या, अन्यथा दर्शनाऐवजी पोलीस स्टेशनची पायरी चढण्याची वेळ येऊ शकते.
