तेलमार्ग खुला ठेवण्याची घोषणा; जागतिक बाजाराचा ताण काहीसा कमी
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ मे २०२६ ।। Strait Of Hormuz :अखेर अनेक दिवसांपासून जगाच्या छातीत धडधड वाढवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीच्या प्रश्नावर इराणने मवाळ भूमिका घेतली आणि तेल आयातीवर अवलंबून असलेल्या भारतासह अनेक देशांनी सुटकेचा निश्वास टाकला. अमेरिका-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझची सामुद्रधुनी बंद होईल, जहाजांवर टोल बसवला जाईल आणि तेलाचे दर आकाशाला भिडतील, अशी भीती व्यक्त केली जात होती. पण आता इराणने थेट घोषणा करत “टोल आकारला जाणार नाही” असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे जागतिक व्यापारमार्गावर निर्माण झालेले भीतीचे सावट काही प्रमाणात दूर झाले आहे.
इराणचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बाघेई यांनी पत्रकार परिषदेत ही भूमिका जाहीर केली. होर्मुझच्या सामुद्रधुनीचे नियंत्रण किनारपट्टीवरील देशांकडे असले तरी व्यापारी जहाजांकडून थेट टोल आकारला जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी इराणने व्यापारी जहाजांसाठी स्वतंत्र प्राधिकरण उभारून शुल्क आकारण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे तेल वाहतुकीचा खर्च वाढणार आणि त्याचा फटका थेट भारतासारख्या देशांना बसणार, अशी चिंता निर्माण झाली होती. मात्र आता इराणने सूर बदलत “टोल नाही, फक्त सेवा शुल्क” अशी नवी भूमिका घेतल्याने परिस्थितीत मोठा फरक पडला आहे.
या निर्णयामागे केवळ आर्थिक नव्हे तर राजनैतिक गणितही दडलेले दिसत आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव कमी करण्यासाठी सुरू असलेल्या चर्चांना आता वेग आला आहे. पाकिस्तान मध्यस्थी करत असल्याच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत. युद्धबंदीचा करार झाला तर पुढील तीस दिवसांत परिस्थिती पूर्ववत केली जाईल, असे संकेत दिले जात आहेत. इराण आणि ओमान मिळून आता नवा करार मसुदा तयार करत असून त्यात पर्यावरण संरक्षणासाठी स्वतंत्र सेवा आणि त्याबदल्यात शुल्क आकारण्याची तरतूद असणार आहे. म्हणजेच “टोल” हा शब्द बाजूला ठेवून “पर्यावरण शुल्क” या नावाने नवा मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट दिसते.
होर्मुझची सामुद्रधुनी म्हणजे जगाच्या अर्थव्यवस्थेची धमनाच मानली जाते. जगातील मोठा तेलपुरवठा याच मार्गाने होतो. त्यामुळे येथे निर्माण होणारा प्रत्येक तणाव भारतातील पेट्रोलपंपापर्यंत पोहोचत असतो. इराणच्या या घोषणेमुळे सध्या तरी तेलबाजाराला दिलासा मिळाला आहे. पण पश्चिम आशियातील राजकारण हे वाळवंटातील वादळासारखे असते — कधी दिशा बदलेल सांगता येत नाही. त्यामुळे जगाने सुटकेचा श्वास घेतला असला तरी सावधगिरीची नजर मात्र अजूनही होर्मुझकडेच लागून आहे.
