![]()
वडापावपासून भेळपर्यंत दरवाढ; प्रवाशांच्या खिशाला नवा फटका
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २७ मे २०२६ ।।रेल्वे प्रवास म्हणजे सामान्य माणसाचा आधार. खिशात कमी पैसे असले तरी स्टेशनवरचा वडापाव, गरम समोसा आणि भेळ यांच्या जोरावर लाखो प्रवासी प्रवासाचा थकवा विसरतात. पण आता त्या वडापावालाही महागाईची नजर लागली आहे. मध्य रेल्वेने १ जूनपासून खाद्यपदार्थांच्या दरात मोठी वाढ जाहीर केली असून, रोज रेल्वेने प्रवास करणाऱ्या सामान्य नागरिकांच्या खिशाला आणखी कात्री बसणार आहे. कालपर्यंत १३ रुपयांत मिळणारा वडापाव आता थेट २० रुपयांना मिळणार आहे, तर १२ रुपयांचा समोसा देखील २० रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच रेल्वे स्टेशनवर भूक भागवायची असेल, तर आता प्रवाशांना आधी खिशाची तपासणी करावी लागणार आहे.
मध्य रेल्वेच्या या नव्या दरपत्रकाने प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. रगडा पाव, सुकी भेळ, चटणी भेळ अशा सर्वसामान्यांच्या आवडीच्या पदार्थांनाही महागाईची झळ बसली आहे. “तिकीट महाग, प्रवास महाग, आता खाणंही महाग,” अशी भावना अनेक प्रवाशांनी व्यक्त केली. मुंबईसारख्या शहरात लाखो नोकरदार रोज रेल्वेवर अवलंबून आहेत. सकाळच्या धावपळीत स्टेशनवरचा वडापाव हा त्यांच्या नाश्त्याचा आधार असतो. पण आता तोच वडापाव छोट्या जेवणाएवढा महाग झाल्याने संताप वाढू लागला आहे. महागाईचा हा फटका फक्त खिशालाच नाही, तर सामान्यांच्या जगण्याच्या पद्धतीलाही बसू लागला आहे.
दरम्यान, कॅटरिंग असोसिएशनने रेल्वे प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. स्थानिक पदार्थांना डावलून ब्रँडेड कंपन्यांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. “चिक्की, चणे, शेंगदाणे, मिल्कशेक यांसारखे स्वस्त आणि पारंपरिक पदार्थ बाजूला सारून महागड्या ब्रँडेड वस्तू विकण्याचा डाव सुरू आहे,” असा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला. प्रवाशांच्या आरोग्यापेक्षा कंपन्यांच्या नफ्याला महत्त्व दिले जात असल्याची टीकाही होत आहे. विशेष म्हणजे, या ब्रँडेड पदार्थांच्या गुणवत्तेबाबत अनेकदा तक्रारी झाल्या असतानाही प्रशासन त्यांनाच प्रोत्साहन देत असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे.
एकीकडे पेट्रोल, गॅस, भाज्या, वीज यांच्या वाढत्या दरांनी जनता आधीच त्रस्त आहे; त्यात आता रेल्वे स्थानकांवरील खाण्याचे पदार्थही महाग झाल्याने प्रवाशांचा संताप उफाळून येत आहे. “सामान्य माणूस नेमकं जगायचं कसं?” हा प्रश्न पुन्हा एकदा समोर उभा राहिला आहे. रेल्वे प्रवास हा स्वस्त आणि सर्वसामान्यांचा पर्याय मानला जातो; पण आता त्या प्रवासालाही महागाईची कीड लागल्याचे चित्र स्पष्ट दिसू लागले आहे. पुढे चहा, कॉफी आणि पाण्याच्या बाटल्यांचे दरही वाढले, तर रेल्वे स्टेशनवर पाय ठेवणंही महाग होईल, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
