युद्धाच्या राखेत पुन्हा पेटले आखाती वादळ

Spread the love

Loading

चर्चा सुरू, पण बॉम्बही सुरूच; तेल, होर्मुज आणि हवाई रणसज्जतेने जगाची झोप उडाली

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २७ मे २०२६ ।। आखातात शांततेची कबुतरे सोडली जातायत आणि त्याच वेळी आकाशातून बॉम्बही कोसळतायत! अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धविरामाच्या चर्चा सुरू असल्याचे जगाला सांगितले जाते; पण पडद्यामागे रणगर्जना अधिक तीव्र होताना दिसते. एका हातात चर्चेचा कागद आणि दुसऱ्या हातात क्षेपणास्त्र घेऊन महासत्ता मैदानात उतरली आहे. अमेरिकेने पुन्हा इराणवर हवाई हल्ले सुरू केल्याच्या बातम्यांनी मध्यपूर्वेचा बारूदाचा ढिग पुन्हा धगधगू लागला आहे. जगभरातील तेलबाजार हादरले, शेअर बाजारांनी कपाळाला हात लावला आणि सामान्य माणसाने पेट्रोल पंपाकडे भीतीने पाहायला सुरुवात केली. कारण युद्ध रणांगणात सुरू असले, तरी त्याची किंमत जगातील प्रत्येक नागरिक भरत असतो.

इराणही काही हातावर हात धरून बसलेले नाही. “आम्हाला अमेरिकेवर विश्वास नाही,” असे सांगत तेथील सत्ताधाऱ्यांनी होर्मुज सामुद्रधुनीला आपले सर्वात मोठे अस्त्र बनवले आहे. जगातील तेलपुरवठ्याची जिवनवाहिनी समजला जाणारा हा समुद्री मार्ग बंद करण्याचा इशारा म्हणजे आर्थिक अणुबॉम्बच! जगातील महासत्ता युद्ध जिंकण्याचे स्वप्न पाहत असताना, इराणने थेट जगाच्या अर्थकारणाची नस पकडली आहे. अमेरिकेचे तळ, ऊर्जा प्रकल्प आणि मित्रदेश यांना लक्ष्य करण्याचे संकेत देत इराणी रिव्होल्यूशनरी गार्ड्स सज्ज झाले आहेत. युद्धाचा नकाशा आता फक्त सीमांवर नाही, तर तेलाच्या टाक्यांवर, समुद्री मार्गांवर आणि डॉलरच्या बाजारावर आखला जातोय.

दुसरीकडे इस्रायलमधील विमानतळ रणांगणात बदलले आहेत. ‘बेन गुरियन’ आणि ‘रेमन’ विमानतळांवर अमेरिकन लढाऊ विमानांची एवढी गर्दी झाली आहे की, सामान्य विमानसेवेलाही अडथळे निर्माण होत आहेत. आकाशात प्रवासी विमानांपेक्षा फायटर जेट्स जास्त दिसू लागले, की समजायचे युद्ध अजून संपलेले नाही! युद्धविरामाचा गजर बाहेर वाजतोय; पण आतून तोफा अजून धडाडत आहेत. अमेरिकेची ही वाढती तैनाती पाहून इराणनेही पूर्ण लष्करी सज्जता जाहीर केली आहे. चर्चेची भाषा ओठांवर असली, तरी बोट मात्र ट्रिगरवरच आहे.

या साऱ्या संघर्षात सर्वात मोठा प्रश्न आहे तो जगाच्या भवितव्याचा. एका बाजूला इराणचे सर्वोच्च नेते मुस्लिम देशांना एकत्र येण्याचे आवाहन करत आहेत, तर दुसरीकडे महासत्ता आपापल्या मित्रराष्ट्रांना युद्धाच्या पटावर मांडत आहेत. शांततेच्या नावाखाली सुरू असलेली ही शक्तीची शर्यत अखेर मानवजातीला कुठे नेणार? सामान्य नागरिकाला ना अमेरिकेचा अहंकार हवा, ना इराणचा प्रतिकार; त्याला हवी आहे फक्त स्थिरता, स्वस्त इंधन आणि सुरक्षित उद्या! पण दुर्दैव इतकेच, की जगाचे भविष्य आता मुत्सद्देगिरीपेक्षा मिसाईलच्या रेंजवर ठरताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *