बसवाल्यांचा नवा फटका; शिक्षणापेक्षा प्रवासच महाग पडणार
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ मे २०२६ ।। School Bus And Van Fee Hike 2026 शाळेची घंटा अजून वाजायची आहे, मुलांच्या पाठीवर दप्तरही चढायचे आहे; पण त्याआधीच पालकांच्या खिशावर महागाईने असा हल्ला चढवला आहे की, अनेक घरांचे मासिक बजेट अक्षरशः डगमगू लागले आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींच्या नावाखाली आता स्कूल बस आणि व्हॅन चालकांनी थेट २० ते २५ टक्क्यांनी शुल्कवाढ जाहीर केली आहे. म्हणजे मुलांना शिक्षणापेक्षा शाळेत पोहोचवणंच अधिक महाग होणार, अशी वेळ आली आहे. अमरावतीत हा निर्णय जाहीर होताच पालकांमध्ये संतापाची लाट उसळली. कारण आधीच फी, पुस्तके, गणवेश, क्लासेस आणि वह्यांच्या खर्चाने कंबर मोडलेली असताना आता वाहतुकीच्या नावाने नव्या जखमेवर मीठ चोळले गेले आहे.
अमरावती जिल्ह्यात सध्या ८०० हून अधिक स्कूल बस आणि व्हॅन रोज हजारो विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचवतात. शहरापासून ग्रामीण भागापर्यंत अनेक पालक नोकरी-व्यवसायामुळे या वाहनांवर पूर्णपणे अवलंबून आहेत. “मुलांना स्वतः सोडायला वेळ नाही आणि आता बसवाल्यांनी खिसाच रिकामा करायचा ठरवलाय,” अशी संतप्त प्रतिक्रिया अनेक पालकांनी दिली. काही ठिकाणी तर एका मुलाच्या वाहतूक शुल्कात महिन्याला हजार ते दीड हजार रुपयांपर्यंत वाढ होणार असल्याची चर्चा आहे. म्हणजे घरात दोन मुलं असतील, तर पालकांनी आता वेगळाच आर्थिक हिशोब मांडावा लागणार आहे. शिक्षणाचा अधिकार जरी मोफत म्हणत असले, तरी प्रत्यक्षात शाळेच्या दारात पोहोचेपर्यंतच सर्वसामान्य माणूस आर्थिकदृष्ट्या अर्धा संपतो, अशी बोचरी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
दुसरीकडे बस आणि व्हॅन चालक-मालक संघटना मात्र स्वतःची बाजू ठामपणे मांडताना दिसत आहे. “डिझेल रोज महाग होतंय, वाहनांचे पार्ट्स महागलेत, चालक-क्लिनरचे पगार वाढलेत, जुन्या दरात गाड्या चालवणं अशक्य झालंय,” असा दावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यांचं म्हणणं चुकीचंही नाही; पण प्रत्येक वाढीचा भार शेवटी पालकांच्या खिशावरच का टाकायचा, हा प्रश्न आता अधिक तीव्रतेने उपस्थित होऊ लागला आहे. सरकार इंधन दरवाढीवर नियंत्रण ठेवू शकत नाही, प्रशासन शाळांच्या फीवर अंकुश ठेवू शकत नाही आणि आता वाहतूक शुल्कही बेभान सुटले आहे. परिणामी पालक अक्षरशः आर्थिक चक्रव्यूहात अडकले आहेत.
या शुल्कवाढीमुळे आगामी काळात पालक आणि बस संघटना यांच्यात संघर्ष उभा राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. काही पालकांनी प्रशासनाने हस्तक्षेप करून दरवाढीवर मर्यादा आणावी, अशी मागणी केली आहे. कारण शाळा ही शिक्षणाची जागा असली, तरी तिच्याभोवती आता व्यवसायाचं जाळं इतकं घट्ट विणलं गेलं आहे की, पालकांची अवस्था ‘ना गाडी सोडता येते, ना खर्च पेलता येतो’ अशी झाली आहे. महागाईच्या या नव्या फटक्याने अनेक घरांतील गणित बिघडणार हे निश्चित. आणि शिक्षणाच्या मंदिराकडे जाणारा रस्ता आता दिवसेंदिवस अधिक महाग होत चालल्याचं वास्तव पुन्हा एकदा समोर आलं आहे.
