![]()
मोदींच्या आवाहनानंतर खरेदीदारांनी ब्रेक लावला; अधिकमास, वाढीव शुल्क आणि महागाईमुळे विक्रीत तब्बल ७० टक्के घसरण
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३० मे २०२६ ।। Gold Buying: सोन्याचा मोह भारतीयांच्या रक्तात आहे, असे म्हटले जाते. लग्न असो, सण असो किंवा गुंतवणूक; सोन्याशिवाय व्यवहार पूर्ण होत नाही, अशी अनेकांची धारणा आहे. पण याच भारतात आता सोन्याच्या दुकानांपुढील गर्दी विरळ होताना दिसत आहे. जिथे काही महिन्यांपूर्वी दागिन्यांच्या शोरूममध्ये ग्राहकांची रांग लागत होती, तिथे आता व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसू लागली आहे. कारण गेल्या काही दिवसांत सोन्याच्या मागणीत तब्बल ७० टक्क्यांची घट नोंदवली गेली आहे. वाढते दर, आयात शुल्कातील मोठी वाढ, पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थिती आणि अधिकमासाचा परिणाम यामुळे ग्राहकांनी खरेदीवर ब्रेक लावल्याचे चित्र आहे. त्यातच देशहितासाठी काही काळ सोने खरेदी टाळावे, या आवाहनाचाही परिणाम बाजारावर झाल्याची चर्चा व्यापारी वर्तुळात रंगू लागली आहे.
१३ मे रोजी केंद्र सरकारने सोन्यावरील आयात शुल्क ६ टक्क्यांवरून थेट १५ टक्क्यांपर्यंत वाढवले आणि बाजारातील समीकरणे बदलली. आधीच विक्रमी उंचीवर असलेल्या सोन्याच्या दरांना या निर्णयामुळे आणखी आधार मिळाला. परिणामी, मागील वर्षी याच काळात सुमारे २५ टनांवर असलेली मागणी अवघ्या ७.५ टनांवर घसरल्याचे आकडे सांगत आहेत. किरकोळ बाजारात सर्वाधिक फटका छोट्या आणि असंघटित व्यापाऱ्यांना बसला आहे. त्यांच्या दुकानांत ग्राहकांची वर्दळ कमी झाली असून व्यवहार ठप्प होण्याची भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, सोन्याचा भाव अजूनही दीड लाख रुपयांच्या वर कायम असल्याने सामान्य ग्राहक खरेदीचा निर्णय पुढे ढकलताना दिसत आहेत. “आज नाही तर उद्या स्वस्त होईल,” या आशेवर अनेक जण थांबले आहेत.
विशेष म्हणजे, केवळ दागिन्यांची खरेदीच नाही तर सोन्यातील गुंतवणूकही मंदावल्याचे संकेत मिळत आहेत. बार, नाणी आणि गुंतवणूक योजनांमध्येही ग्राहकांनी सावध भूमिका घेतली आहे. भारतात दरवर्षी ८०० ते ८५० टन सोन्याचा वापर होतो. त्यामुळे मागणीत झालेली ही घसरण किरकोळ नाही. अधिकमासामुळे शुभ खरेदी टाळणाऱ्यांची संख्या वाढली, तर दुसरीकडे वाढलेल्या करांमुळे सोन्याची किंमत सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली. परिणामी, “आधी देश, मग दागिने” असा सूर काही ग्राहकांमध्ये दिसू लागला आहे. मात्र बाजारातील जाणकारांच्या मते ही शांतता कायमस्वरूपी राहणार नाही. लग्नसराई आणि सणासुदीचा हंगाम सुरू होताच सोन्याची चमक पुन्हा ग्राहकांना आकर्षित करेल. सध्या मात्र सोन्याच्या बाजारात खणखणाटापेक्षा शांततेचाच आवाज अधिक स्पष्ट ऐकू येत आहे.
