Bhimashankar Temple : भीमाशंकरात VIP संस्कृतीला अखेर कुलूप; समान दर्शनाचा नवा अध्याय

Spread the love

Loading

ऑनलाईन बुकिंगशिवाय प्रवेश नाही; देवासमोर सगळेच समान म्हणत प्रशासनाचा ऐतिहासिक निर्णय

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ जून २०२६ ।। देवाच्या दरबारात माणसाची ओळख त्याच्या पदाने नसते, तर श्रद्धेने असते. पण वर्षानुवर्षे मंदिरांच्या रांगेत हे तत्त्व अनेकदा हरवत गेलं. सामान्य भाविक तासन्‌तास उन्हात उभा राहायचा आणि VIP पाहुणे काही मिनिटांत दर्शन घेऊन बाहेर पडायचे. आता ही परंपरा भीमाशंकरमध्ये इतिहासजमा होणार आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर देवस्थानाने धाडसी निर्णय घेत, VIP दर्शन व्यवस्था पूर्णपणे बंद केली आहे. यापुढे मंत्री असो, अधिकारी असो, लोकप्रतिनिधी असो किंवा सामान्य भक्त… देवाच्या दारात सगळ्यांसाठी एकच रांग आणि एकच नियम असणार आहे. देवस्थानाच्या या निर्णयाने समानतेचा संदेश देत मंदिर व्यवस्थापनात नवा आदर्श निर्माण केला आहे.

देवस्थान प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त बैठकीत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. विशेष दर्शनामुळे निर्माण होणारा गोंधळ, सुरक्षा व्यवस्था, सामान्य भाविकांची गैरसोय आणि वाढणारा रोष या सर्व बाबींचा विचार करून VIP पासला कायमचा रामराम ठोकण्यात आला आहे. यापुढे कोणालाही स्वतंत्र प्रवेशद्वार किंवा विशेष दर्शनाची सुविधा मिळणार नाही. प्रत्येक भाविकाला समान प्रक्रियेतूनच दर्शन घ्यावे लागेल. मंदिर प्रशासनाच्या मते, हा निर्णय केवळ शिस्तीसाठी नाही, तर श्रद्धेच्या समानतेसाठी आहे. देवासमोर कुणी मोठा नाही आणि कुणी लहान नाही, हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देण्याचा प्रयत्न म्हणून या निर्णयाकडे पाहिले जात आहे.

यासोबतच दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग सक्तीचे करण्यात आले आहे. स्लॉट आरक्षित केल्याशिवाय मंदिर परिसरात प्रवेश मिळणार नाही, अशी स्पष्ट भूमिका प्रशासनाने घेतली आहे. सध्या भाविकांची प्रचंड गर्दी होत असल्याने २४ तारखेपर्यंतचे सर्व स्लॉट आधीच पूर्ण भरले आहेत. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाने किमान दोन दिवस आधी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक ठरणार आहे. या व्यवस्थेमुळे गर्दीचे नियोजन, सुरक्षा आणि दर्शनाची गती अधिक चांगली राहील, असा प्रशासनाचा विश्वास आहे. तासन्तास रांगेत उभे राहण्याऐवजी नियोजित वेळेत शांतपणे दर्शन घेण्याची संधी भाविकांना मिळणार आहे.

भीमाशंकर देवस्थानाचा हा निर्णय केवळ एका मंदिरापुरता मर्यादित राहणार नाही, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. राज्यातील इतर मोठ्या देवस्थानांनीही अशीच समान दर्शन व्यवस्था लागू करावी, अशी मागणी अनेक भाविकांकडून होत आहे. श्रद्धा ही विशेषाधिकारावर नव्हे, तर समानतेवर उभी राहिली पाहिजे, हा संदेश भीमाशंकरने दिला आहे. देवाच्या दारात सत्ता, संपत्ती आणि ओळखीची दारे बंद करून श्रद्धेची दारे सर्वांसाठी खुली करण्याचा हा निर्णय भाविकांच्या मनात दीर्घकाळ लक्षात राहील, यात शंका नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *