Chhatrapati Sambhajinagar FDA Raid: मुंढेंच्या धडाक्याने बोगस चवेला कुलूप लागले

Spread the love

Loading

रंग, बुरशी अन् फसवणुकीचा बाजार उघडा; नामांकित हॉटेलांचे परवाने थेट निलंबित

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०३ जुलै २०२६ ।। Chhatrapati Sambhajinagar FDA Raid: चमचमीत ग्रेव्ही, तुपकट बटर आणि सुगंधी मसाल्यांच्या नावाखाली ग्राहकांच्या ताटात नेमकं काय वाढलं जात होतं, याचा धक्कादायक पर्दाफाश अखेर झाला. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या “सेफ फूड, सेफ महाराष्ट्र” मोहिमेने छत्रपती संभाजीनगरातील दोन गाजलेल्या हॉटेलांचा मुखवटा एका झटक्यात फाडला. शहरातील प्रसिद्ध ‘यल्ला यल्ला’ आणि ‘आईच्या गावात’ या हॉटेलांवर एफडीएच्या पथकाने धडक कारवाई करत त्यांच्या अन्न परवान्यांवर थेट निलंबनाची मोहोर उमटवली. ग्राहकांच्या ताटात चव नव्हे, तर रसायनांचा खेळ आणि फसवणुकीचा मेनू वाढला जात असल्याचे उघड होताच प्रशासनाने दिरंगाई न करता कारवाईचा हातोडा चालवला. नाव मोठं आणि लक्षण खोटं, याची जिवंत साक्षच या कारवाईतून समोर आली.

विद्यानगरमधील ‘यल्ला यल्ला’ रेस्टॉरंटमध्ये तपासणीसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना जे दिसलं ते अंगावर काटा आणणारं होतं. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बटर चिकन, कबाब आणि चिकन लॉलीपॉप अधिक लालभडक आणि रुचकर दिसावेत म्हणून सिंथेटिक रासायनिक रंगांचा अक्षरशः पाऊस पाडला जात होता. चवीपेक्षा रंगालाच जास्त महत्त्व देणाऱ्या या स्वयंपाकघरात तब्बल वीस ते पंचवीस प्रकारचे रासायनिक रंगांचे डबे सापडले. ते जागेवरच जप्त करून नष्ट करण्यात आले. जेवणाच्या नावाखाली आरोग्याशी असा जुगार खेळला जात असेल, तर ग्राहकांनी बिल भरायचं की औषधांची पावती, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

दुसरीकडे ‘आईच्या गावात’ या नावात मायेचा गंध असला, तरी स्वयंपाकघरात मात्र फसवणुकीचा वास दरवळत असल्याचे तपासात स्पष्ट झाले. मेनूकार्डवर ‘बटर नान’ लिहून प्रत्यक्षात स्वस्त दर्जाचा वेजिटेबल फॅट स्प्रेड ग्राहकांच्या ताटात वाढला जात होता. इतक्यावरच हा प्रकार थांबला नाही. स्टोअररूममध्ये रसासाठी वापरण्यात येणारे बुरशी लागलेले आंबे, सडलेल्या पालेभाज्या आणि निकृष्ट दर्जाचे खाद्यसाहित्य आढळून आले. ग्राहकांनी पैशाने बटर मागवायचं आणि बदल्यात फसवणूक खायची, हा प्रकार एफडीएच्या पथकाने रंगेहात पकडला. हॉटेलच्या चमकदार सजावटीमागे आरोग्याला घातक असलेलं वास्तव दडलेलं असल्याचं या कारवाईने उघड केलं.

अन्न सुरक्षा व मानके अधिनियमाचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी एफडीएचे अधिकारी व. ता. रोडे, कि. ल. झाडे आणि सहाय्यक आयुक्त द. वि. पाटील यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली. तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट संदेश दिला आहे—ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांची प्रतिष्ठा कितीही मोठी असो, कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही. चमकदार बोर्ड, आलिशान इंटिरियर आणि मोठ्या जाहिरातींच्या आड जर अस्वच्छता, भेसळ आणि फसवणूक लपलेली असेल, तर त्या दारावर कुलूप पडणारच. या कारवाईने केवळ दोन हॉटेलांचे परवाने निलंबित झाले नाहीत, तर संपूर्ण खाद्यव्यवसायालाच स्पष्ट इशारा मिळाला आहे—ताटात विश्वास वाढवा, नाहीतर परवान्यावर लाल शिक्का तयार ठेवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *