मोरवाडीत उत्साहात झाले झेंडावंदन

Spread the love

Loading

राष्ट्रीय सणात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ ऑगस्ट २०२६ ।। मोरवाडी : म्हाडा मोरवाडी येथील मधुबन हौसिंग सोसायटीमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते दीपक भोजने यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी मधुबन, निसर्ग आणि तक्षशिला हौसिंग सोसायटीतील सभासद तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते. लहान मुलांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याने परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमाला मधुबन सोसायटीचे अध्यक्ष सुहास कुलकर्णी, सचिव तुषार खैरनार, छपाणी मोहन, संतोष नाईक, कुंजीर, अकुलवार सेतुरमण, हेमंत सैदाणे, शंतनू देशमुख, दशरथ परब, आदित्य घुले यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. राष्ट्रीय सणाच्या निमित्ताने नागरिकांनी एकत्र येत सामाजिक बांधिलकी आणि देशप्रेमाची भावना व्यक्त केली.

यावेळी मनोगत व्यक्त करताना दीपक भोजने यांनी नागरिकांच्या उपस्थितीबाबत खंत व्यक्त केली. तीनही सोसायट्यांमधून मिळून किमान शंभर नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहणे अपेक्षित होते, असे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्यदिन हा केवळ सुट्टीचा दिवस नसून देशासाठी महत्त्वाचा राष्ट्रीय उत्सव आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन राष्ट्रीय भावना जपली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

सुहास कुलकर्णी यांनीही नागरिकांच्या सामाजिक शिस्तीवर भाष्य केले. स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे झाली असली, तरी नागरिकांनी आपल्या दैनंदिन वर्तनात शिस्त आणणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. परदेशातील नागरिक सार्वजनिक ठिकाणी अधिक शिस्तबद्धपणे वागत असल्याचे उदाहरण देत, रस्त्यावर थुंकणे, कचरा टाकणे यांसारख्या सवयी सोडण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. स्वातंत्र्याचा खरा अर्थ केवळ अधिकार मिळणे नसून जबाबदार आणि शिस्तबद्ध नागरिक म्हणून वागणे हाही आहे, असा संदेश कार्यक्रमातून देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *