![]()
प्रारूप यादी ३१ ऑगस्टला; दावे-हरकतींसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ ऑगस्ट २०२६ ।। महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला (SIR) आता नवे वेळापत्रक मिळाले आहे. मतदार यादीतील नावांची छाननी, दुरुस्ती आणि पात्र मतदारांचा समावेश करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रक्रियेचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. मात्र, पुढील टप्प्यांसाठी भारत निवडणूक आयोगाने कार्यक्रमात बदल केला आहे. त्यामुळे आधी २७ ऑक्टोबरला जाहीर होणारी अंतिम मतदार यादी आता ४ नोव्हेंबरला प्रसिद्ध केली जाणार आहे. निवडणूक यादी म्हणजे फक्त कागदावरची नावे नव्हेत; त्यावर नागरिकाचा मतदानाचा अधिकार उभा असतो. त्यामुळे नाव चुकले, गायब झाले किंवा चुकीची माहिती नोंदली गेली, तर त्याचा फटका थेट मतदानाच्या दिवशी बसू शकतो.
नव्या कार्यक्रमानुसार एसआयआरच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रारूप मतदार यादी २४ ऑगस्टऐवजी ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. ही यादी जाहीर झाल्यानंतर नागरिकांना आपले नाव आहे की नाही, नावातील माहिती योग्य आहे का, तसेच पात्र कुटुंबीयांची नावे मतदार यादीत आहेत का, हे तपासण्याची संधी मिळणार आहे. निवडणूक आयोगाने वेळापत्रक बदलले असले तरी नागरिकांची जबाबदारी कमी झालेली नाही. उलट प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रत्येक मतदाराने आपले नाव तपासणे गरजेचे आहे. ‘नाव मागच्या वेळी होते, यावेळीही असेल’ या भरोशावर बसणाऱ्यांना मतदानाच्या दिवशी धक्का बसू शकतो.
प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर अशी मुदत देण्यात आली आहे. म्हणजेच मतदार यादीत नाव नसल्यास, नाव किंवा इतर तपशीलात त्रुटी असल्यास संबंधित नागरिकांना या कालावधीत दुरुस्तीची मागणी करता येणार आहे. त्यानंतर प्राप्त दावे आणि हरकतींवर निर्णय घेण्यासाठी ३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबर हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. प्रशासनाकडून या हरकतींची छाननी करून पात्र मतदारांची नावे कायम ठेवणे आणि चुकीच्या नोंदी दुरुस्त करणे अपेक्षित आहे. त्यामुळे प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर ‘आपले नाव शोधणे’ हे प्रत्येक मतदाराचे पहिले काम असायला हवे.
या बदलानंतर ४ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. वेळापत्रक पुढे ढकलले असले तरी नागरिकांनी शेवटच्या दिवसाची वाट पाहणे धोक्याचे ठरू शकते. कारण मतदार यादीत नाव असणे ही मतदानाची मूलभूत पूर्वअट आहे. प्रशासन आपले काम करेलच; पण लोकशाहीत मतदारानेही आपले नाव शोधण्याइतकी तरी जागरूकता दाखवली पाहिजे. निवडणुकीच्या आधी मोठमोठ्या घोषणा ऐकून उपयोग नाही; मतदानाच्या दिवशी बोटावर शाई हवी असेल, तर मतदार यादीत नाव आधीपासून हवे!
