![]()
मोशीतील गावठाण आणि भारतमाता चौकात प्रायोगिक चाचणी; डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानंतर महापालिकेचा पुढाकार, महेश कावळे यांची माहिती.
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। पिंपरी-चिंचवडच्या रस्त्यांवर वाहनांची गर्दी वाढत असताना चौकाचौकांत सिग्नलचा लाल दिवा आणि वाहनचालकांचा संताप हे रोजचेच चित्र झाले आहे. वाहतूक कोंडीने नागरिकांचा वेळ, इंधन आणि संयम तिन्हींचा बळी घेतला असताना आता महापालिकेने कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) आधार घेण्याचे ठरवले आहे. पुणे-नाशिक महामार्गावरील मोशी गावठाण आणि भारतमाता या दोन चौकांत अनुकूली वाहतूक नियंत्रण प्रणाली (एटीसीएस) प्रायोगिक तत्त्वावर बसवण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कोंडीच्या चौकांतील सिग्नल व्यवस्थेत तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश विद्युत विभागाला दिले आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी करताना विद्यमान सीसीटीव्ही यंत्रणेचा उपयोग करण्याचे नियोजन आहे. मात्र, एआयचा गाजावाजा करून वाहतूक कोंडी एका रात्रीत गायब होईल, अशी अपेक्षा बाळगणे म्हणजे तंत्रज्ञानाला जादूची कांडी समजण्यासारखे आहे. यंत्रणा योग्य चालली, तरच तिचा उपयोग; अन्यथा महागड्या उपकरणांसोबत वाहनांच्या रांगा तशाच राहतील.
महापालिकेच्या २०२५-२६ च्या पर्यावरण सद्यःस्थिती अहवालानुसार शहरात तब्बल ३० लाख ७५४ नोंदणीकृत वाहने आहेत. लोकसंख्याही ३० लाखांच्या पुढे गेल्याने रस्त्यांवरील ताण वाढत आहे. शहरात सुमारे २,०७३ किलोमीटरचे पक्के आणि कच्चे रस्ते असून, १५४ चौकांत सिग्नल व्यवस्था आहे. तरीही नाशिक फाटा, भूमकर चौक, डांगे चौक, मुकाई चौक, गोडाऊन चौक, फिनोलेक्स चौक, खंडोबा माळ चौक, बोऱ्हाडेवस्ती चौक, त्रिवेणीनगर चौक, लक्ष्मी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक, भुजबळ चौक, ताथवडे अंडरपास, काळाखडक रस्ता, तळवडे चौक, फिनिक्स मॉल परिसर, काशिद पार्क, भोसरी बसस्थानक, पुनावळे ब्रीज अंडरपास, चिखली चौक, देहू फाटा, टिळक उड्डाणपूल, दापोडी मेट्रो स्टेशन, गणेशनगर चौक आणि भूमकर चौक परिसरात कोंडीची समस्या कायम आहे. सिग्नल उभारणे आणि वाहतूक सुरळीत ठेवणे या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत, याची जाणीव प्रशासनाला आता तरी व्हायला हवी.
एटीसीएस यंत्रणा रस्त्यावरील वाहनांची संख्या आणि गर्दीचा अंदाज घेऊन सिग्नलचा हिरवा दिवा किती वेळ सुरू ठेवायचा, हे ठरवू शकते. सध्या निश्चित वेळापत्रकानुसार चालणाऱ्या सिग्नलमुळे एका बाजूला वाहनांची लांब रांग लागलेली असतानाही दुसऱ्या बाजूचा रस्ता रिकामा असू शकतो. नव्या प्रणालीत परिस्थितीनुसार वेळ बदलता येईल. विद्युत विभागाचे सहशहर अभियंता महेश कावळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोशीतील दोन्ही चौकांत यंत्रणा बसवल्यानंतर सात दिवस चाचणी घेऊन परिणामांचा अभ्यास केला जाणार आहे. चाचणी यशस्वी झाल्यास शहरातील अन्य गर्दीच्या चौकांत टप्प्याटप्प्याने तिचा विस्तार करण्याचे नियोजन आहे. मात्र, चाचणीचे निष्कर्ष, प्रत्यक्ष प्रतीक्षेतील घट आणि यंत्रणेचा देखभाल खर्च यांची माहितीही नागरिकांसमोर मांडली पाहिजे. तंत्रज्ञानाबरोबर रस्त्यांचे नियोजन, अतिक्रमणांवरील कारवाई आणि वाहतूक शिस्त यांनाही महत्त्व द्यावे लागेल. अन्यथा एआय सिग्नल हिरवा होईल; पण शहराच्या वाहतुकीचा मार्ग मात्र लालच राहील.
